नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये रविवारी किंचित घट झाली. नव्या दरकपातीनुसार राजधानी दिल्लीत पेट्रोलचे भाव 15 पैशांनी कमी झाले आहेत. दिल्लीत आता 101.19 रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोल मिळत आहे. तर डिझेलच्या किमतीतही 15 पैशांची घट झाली असून डिझेलचा दर आता 88.62 रुपये झाला आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात 13 पैशांची घट झाली असून सध्याचा दर 107.26 रुपये प्रतिलिटर आहे. तर डिझेल 96.19 रुपये प्रतिलिटर आहे. आंतरराष्ट्रीय तेल कंपन्यांचे दर स्थिर असले तरी भारतातील सरकारी तेल कंपन्यांनी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला तेलाच्या किमतीत काहीशी घट केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सतत वाढत जाणाऱया पेट्रोल-डिझेलच्या दरांमुळे वाहनधारक वैतागले असतानाच त्यांना दरकपातीमुळे थोडाफार दिलासा मिळाला आहे. मागील महिन्यातही दोन-चारवेळा अशाप्रकारे किंचित दरकपात झाली होती.