द मॉर्निंग कंसल्टचे सर्वेक्षण – अमेरिकेचे अध्यक्ष 5 व्या स्थानावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. द मॉर्निंग कंसल्टच्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. सर्वेक्षणानुसार पंतप्रधान मोदींनी अप्रूव्हल रेटिंगमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन समवेत जगातील 13 राष्ट्रप्रमुखांना मागे टाकले आहे. पंतप्रधान मोदींचे अप्रूव्हल रेटिंग 70 टक्के आहे.
2 सप्टेंबर रोजी अपडेट करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात भारताचे पंतप्रधान जगातील अन्य राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या तुलनेत खूपच आघाडीवर आहेत. पंतप्रधान मोदींनी मेक्सिकन राष्ट्रपती आंद्रे मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर, इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी, जर्मन चॅन्सेलर अँजेला मर्केल, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासमवेत अनेक मोठय़ा नेत्यांना लोकप्रियतेप्रकरणी खूपच मागे टाकले आहे.
या यादीत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोल्सोनारो देखील सामील आहेत.
कोरोनाचा फटका
द मॉर्निंग कंसल्टच्या सर्वेक्षणानुसार भारतात कोरोनाच्या दुसऱया लाटेदरम्यान पंतप्रधान मोदींच्या डिसअप्रूव्हल रेटिंग (लोकप्रियतेतील घसरण) वाढले होते. तेव्हा कोरोनामुळे रुग्णालयांमधील ऑक्सिजनच्या तुटवडय़ाने देशाला हादरवून सोडले होते. पण पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने या संकटस्थितीवर लवकरच मात केली होती.
मे महिन्यात 84 टक्के लोकप्रियता
पंतप्रधान मोदींचे अप्रूव्हल रेटिंग मे 2020 मध्ये सर्वाधिक 84 टक्के होते. तेव्हा भारत कोरोना महामारीतून बाहेर पडू लागला हाता. तर जून महिन्यात प्रसिद्ध अप्रूव्हल रेटिंगच्या तुलनेत यंदा पंतप्रधान मोदींच्या अप्रूव्हल रेटिंगमध्ये सुधारणा झाली आहे. जून महिन्यात मोदींचे अप्रूव्हल रेटिंग 66 टक्के इतके होते. मोदींच्या डिसअप्रूव्हल रेटिंगमध्येही घट झाली आहे.
13 राष्ट्रप्रमुखांचे मानांकन
क्रमांक राष्ट्रप्रमुख देश अप्रूव्हल रेटिंग
1 नरेंद्र मोदी भारत 70 टक्के
2 लोपेझ ओब्राडोर मेक्सिको 64 टक्के
3 मारियो द्राघी इटली 63 टक्के
4 अँजेला मर्केल जर्मनी 53 टक्के
5 जो बायडेन अमेरिका 48 टक्के
6 स्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलिया 48 टक्के
7 जस्टिन ट्रुडो कॅनडा 45 टक्के
8 बोरिस जॉन्सन ब्रिटन 41 टक्के
9 जेर बोल्सोनारो ब्राझील 39 टक्के
10 मून जे-इन दक्षिण कोरिया 38 टक्के
11 पेड्रो सांचेज स्पेन 35 टक्के
12 इमॅन्युएल मॅक्रॉन फ्रान्स 34 टक्के
13 योशिहिदे सुगा जपान 25 टक्के
अप्रूव्हल-डिसअप्रूव्हल रेटिंग
द मॉर्निंग कंसल्ट अप्रूव्हल आणि डिसअप्रूव्हल रेटिंग 7 दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजच्या आधारावर निश्चित करते. या कॅल्यकुलेशनमध्ये 1 ते 3 टक्क्यांपर्यंतच प्लस-मायनस मार्जिन असतो. म्हणजेच अप्रूव्हल आणि डिसअप्रूव्हल रेटिंगमध्ये 1-3 टक्क्यांपर्यंतची भर किंवा घट होऊ शकते. ही आकडेवारी तयार करण्यासाठी द मॉर्निंग कंसल्टने भारतात सुमारे 2,126 जणांची ऑनलाईन मुलाखत घेतली होती.









