इचलकरंजी / प्रतिनिधी
महापूरग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेल्या पंचगंगा परिक्रमा जलसमाधी पदयात्रेला रविवार सकाळी अब्दुललाट ( ता. शिरोळ) गावातून सुरुवात झाली आहे. ही जलसमाधी पदयात्रा हेरवाड, तेरवाड, कुरुंदवाड मार्गे नृसिंहवाडीकडे मार्गस्थ झाली असून, यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकते आणि पूरग्रस्त शेतकरी हजारोच्या संख्येने सहभागी झाले आहेत.
माजी खा. शेट्टी यांनी १ सप्टेंबर पासून प्रयाग चिखली ( करवीर) येथून पंचगंगा उगम ते संगम अशी पंचगंगा परिक्रमा जलसमाधी पदयात्रा सुरु केली आहे. आज, या जलसमाधी पदयात्रेचा शेवटचा दिवस आहे. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास या जलसमाधी पदयात्रेला अब्दुललाट ( ता. शिरोळ) येथून सुरुवात झाली आहे. यामध्ये कोल्हापूर सांगली जिल्ह्यासह कर्नाटक सीमा भागातून संघटनेचे पदाधिकारी, कार्यकतै आणि पूरग्रस्त शेतकरी सहभागी झाले आहेत. शिरोळ पोलिसांनी याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.
यावेळी यात्रेत सहभागी शेतकऱ्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. तर, हेरवाड (ता. शिरोळ) येथे पोलीस व आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली.
तर, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कोणतेही जीवीतहानी होवू नये, याकरीता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्याना कोणीही जलसमाधी करु नका. संगमाच्या ठिकाणी नदी खोल आहे, अशा आशयाच्या नोटीसा लागू केल्या आहेत.
नदी संगम परिसरात पोलिसांनी नदीच्या दोन्ही काटावर मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच नदीमध्ये रेस्क्यु फोर्स सहा पथके यांत्रिक बोटीसह तैनात आहेत. पोहणाऱ्या पोलीसांच्यासह काही आपतकालीन पथकातील कर्मचारी, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल तैनात केले आहे. यामुळे नृसिहवाडी येथील संगम परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.