खासदार विनायक राऊत यांच्याकडून शक्यता व्यक्त : ‘अलाएन्स एअर’ची प्रवासी वाहतुकीची तयारी
प्रतिनिधी / कुडाळ:
चिपी-परुळे येथील सिंधुदुर्ग विमानतळ विमान वाहतुकीस पूर्ण सज्ज झाला आहे. अलाएन्स एअर या विमान वाहतूक करणाऱया कंपनीने 7 ऑक्टोबरपासून प्रवासी वाहतूक करण्यास तयार असल्याचे विमान वाहतूक मंत्रालयाला कळविल्याने नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग विमानतळ सुरू होणार असल्याची शक्यता खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन केंद्र सरकारशी चर्चा करून 7 ऑक्टोबरला विमानतळ उद्घाटनाची तयारी करण्याच्यादृष्टीने सर्व संबंधित अधिकाऱयांना आदेश द्यावेत, अशी विनंती करणारे निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात म्हटले आहे, आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने करीत असलेल्या पाठपुराव्यामुळे सिंधुदुर्ग विमानतळ आता प्रवासी विमान उड्डाण करण्यास सज्ज झाला आहे. अलाएन्स एअर या कंपनीने 7 ऑक्टोबर 2021 पासून प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्याची आपली तयारी असल्याबाबतचे पत्र विमान वाहतूक मंत्रालयाला दिले आहे.
हवाई वाहतूक मंत्रीही उपस्थित राहणार
केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही शुभारंभादिवशी उपस्थित राहण्याची तयारी दर्शविली आहे. सिंधिया तसेच आपण, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत प्रस्तावित 7 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग विमानतळ सुरू करण्याच्यादृष्टीने योग्य ती तयारी करण्याचे आदेश सर्व संबंधित अधिकाऱयांना द्यावेत. राऊत यांच्यासमवेत परिवहन मंत्री अनिल परब व खासदार अनिल देसाई उपस्थित होते.
विमानसेवा सुरू करण्यास सर्वांची सहमती
राऊत म्हणाले, आपण दिल्लीत सिंधिया यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. तसेच एव्हिएशन सेक्रेटरी, डिजीसीए चेअरमन, एअर अलाएन्स विमानसेवा व हवाई मंत्रालय या सर्वांशी संपर्क साधून चर्चा केली. आता विमानसेवा सुरू करण्यास सर्वांनी सहमती दर्शविली आहे. सात ऑक्टोबरपूर्वी सर्व यंत्रणा सज्ज होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.









