सेवा समाप्त केलेल्या 342 आरोग्य कर्मचाऱयांची जिल्हाधिकाऱयांकडे धाव
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोविड काळात आरोग्य सेवा देण्यासाठी कंत्राटी पद्धतीने घेण्यात आलेल्या 342 डॉक्टर, नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सफाईगार कर्मचाऱयांची 1 सप्टेंबरपासून सेवा समाप्त करताच या आरोग्य कर्मचाऱयांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे धाव घेतली व कोविड काळात केलेल्या सेवेची दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा आणि आरोग्य सेवेत पुन्हा घ्या, अशी आर्त मागणी केली आहे. तसेच कोविड केअर सेंटर बंद करू नये, अशी मागणीही केली आहे.
कोविड काळात आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी कंत्राटी पद्धतीने डॉक्टर, नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व इतर कर्मचारी असे 192 आणि सफाईगार 150 अशा एकूण 342 जणांना कंत्राटी पद्धतीने घेतले या सर्वांच्या सेवा 1 सप्टेंबरपासून समाप्त करण्यात आल्या आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी एकाच वेळी सर्व कंत्राटी कर्मचाऱयांना सेवा समाप्तीचे आदेश काढताच आरोग्य यंत्रणेमध्ये खळबळ उडाली.
सेवा समाप्तीचे आदेश मिळताच सर्व कर्मचारी एकवटले व न्याय मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱयांकडे धाव घेतली. कोविड काळात आरोग्य सेवा द्यायला कुणी पुढे येत नसताना आम्ही सर्वजण जोखीम पत्करून सेवा दिली आणि आज अचानक सेवा समाप्ती केली, हा फार मोठा अन्याय आहे, याकडे लक्ष वेधले. अंकिता देसाई, नम्रता गायकवाड, योगिता आल्मेडा, सूरज मुंडे यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन मागण्याचे निवेदन सादर केले.
कंत्राटी कर्मचारी असलो, तरी कंत्राटी पद्धतीने घेताना जो बॉण्ड करून घेतला आहे, त्यामध्ये कोविड संपेपर्यंत सेवेत ठेवणार, असे म्हटले होते. त्यामुळे अजून कोविड संपलेला नसताना सेवा समाप्त करणे योग्य नाही. आजही जिल्हय़ात दररोज 50 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत आणि कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेचा धोका आहेच. असे असतानाही सेवा समाप्त करण्यात आली आहे.
कंत्राटी पद्धतीने काम करणाऱया कर्मचाऱयांची सेवा समाप्ती केल्यामुळे 342 जाणावर बेरोजगारीची कुऱहाड कोसळली आहे. सर्व परिस्थितीचा आणि आम्ही कोरोना काळात दिलेल्या सेवेचा विचार करून सर्व कर्मचाऱयांना पुन्हा सेवेत घ्यावे, अशी आग्रही मागणी जिल्हाधिकाऱयांकडे केली. मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही देण्यात आला.

फंड नसल्यानेच शासनाच्या निर्देशांनुसार सेवा समाप्त!
राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक तथा आरोग्य सेवा विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन यांनी पाठवलेल्या पत्रानुसार कोविड-19 काळात घेण्यात आलेल्या मनुष्यबळासाठी केंद्र शासनाने फंड उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे कोविड काळात घेण्यात आलेल्या कर्मचाऱयांची सेवा 1 सप्टेंबरपासून समाप्त करावी, असे निर्देश दिलेले आहेत. त्यांच्या निर्देशानुसारच सर्व कंत्राटी आरोग्य कर्मचाऱयांची सेवा समाप्त केली आहे, असे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केले. शासनाने फंड उपलब्ध करून दिला व कर्मचाऱयांना परत घेण्याचे निर्देश दिले, तर सर्वांना पुन्हा सेवेत घेण्यात येईल, असेही आश्वासनही जिल्हाधिकाऱयांनी दिले.









