लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, जमिनीच्या हरकतीच्या दाव्याचा निकाल बाजूने दिला म्हणून लाचेची मागणी
प्रतिनिधी/कोल्हापूर
शेतजमिनीच्या हरकतीच्या दाव्याचा निकाल तक्रारदारांच्या बाजूने दिला म्हणून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या गडमुडशिंगीच्या मंडल अधिकारी आणि दोन कोतवालांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. मंडल अधिकारी अर्चना मिलिंद गुळवणी (वय 47 रा. संभाजीनगर), कोतवाल- तात्यासो धनपाल सावंत (वय 38, सजा वसगडे, रा. वसगडे), कोतवाल- युवराज कृष्णात वडृ (वय 35, सजा गडमुडशिंगी, रा. गडमुडशिंगी ) अशी अटक केलेल्यांची नांवे आहेत.

तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या हरकतीच्या दाव्याचा निकाल तक्रदारांच्या बाजूने झाला. निकाल तक्रदाराच्या बाजूने दिला म्हणून कोतवाल सावंत आणि वडृ यांनी तक्रारदरांकडे 30 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोड होऊन 25 हजार रुपये देण्याचे ठरले. यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक सतीश मोरे, हेड काॅन्स्टेबल शैलेश पोरे, पोलीस नाईक विकास माने , सुनिल घोसाळकर, रुपेश माने यांनी या तक्रारीची 27 ते 30 आॅगस्ट दरम्यान पडताळणी केली. यानंतर बुधवारी सापळा लावला होता. बुधवारी 25 हजार रुपयांची लाच घेताना त्यांना रंगेहात अटक केली.
या कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अफ्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, अफ्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांनी मार्गदर्शन केले.









