टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणार्या मीराबाई चानू, लवलिना,. पी.व्ही. सिंधू यांचं खूप कौतुक झालं. महिला हॉकी संघाची कर्णधार रानी रामपालवरही कौतुकाचा वर्षाव झाला. आता भारताच्या अजून एका मुलीने पॅरालिम्पिकमध्ये पदक पटकावलं आहे. भाविनाबेन पटेल असं या खेळाडूचं नाव असून तिने टेबल टेनिसमध्ये पदक पटकावत ही करामत करून दाखवली आहे.
भा विनाबेन पटेल हे नाव फारसं परिचित नाही. भाविना गुजरामधल्या मेहसाणा जिल्ह्यातल्या सुंधिया गावची. टोकियोमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. मीराबाई चानू, पी.व्ही. सिंधू, लवलिना यांनी पदकं पटकावली. सर्वांनीच त्यांचं कौतुक केलं. यानंतर पॅरालिम्पिकमध्ये भाविनाबेनने कमाल केली आहे. भारताच्या या खेळाडूने टेबल
टेनिसमध्ये पदक पटकावलं आहे. भविनाने 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसमध्ये पदार्पण केलं. 2011 मध्ये तिने पहिलं पदक पटकावलं. पॅरा टेबल टेनिस थायलंड ओपनमध्ये भाविनाला रौप्य पदक मिळालं होतं. 2013 मधल्या आशियाई रिजनल चॅम्पियनशीप स्पर्धेत तिने भारतासाठी पहिलं पदक पटकावलं. भाविना जॉर्डन, चीन, जपान, दक्षिण कोरिया, जर्मनी, स्लोव्हेनिया, थायलंड, स्पेन आणि नेदरलँड्ससारख्या देशांमध्ये जाऊन आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळते.
2019 मध्ये तिने पहिलं सुवर्णपदक पटकावलं. भाविनाचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. भाविना अवघ्या एक वर्षांनी असताना तिचा पाय लुळा पडला. भाविनाला पोलिओचं निदान झालं. निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातल्या भाविनावर सुरूवातीच्या टप्प्यात उपचार होऊ शकले नाहीत. भविनावर विशाखापट्टनममध्ये शत्रक्रिया करण्यात आली. मात्र त्यानंतर तिने फारशी काळजी न घेतल्यामुळे तिच्या तब्बेतीत सुधारणा होऊ शकली नाही. त्यामुळे तिला लहानपणीच व्हिलचेअर जवळ करावी लागली. भाविना सर्वसामान्य शाळेत शिकली. 2004 मध्ये वडिलांनी तिला
अहमदाबादच्या ब्लाईंड पीपल्स असोसिएशनमध्ये दाखल केलं. इथून तिने पदवी पूर्ण केली. कॉम्प्युटरचं ज्ञान मिळवलं.
इथेच तिला प्रशिक्षक लालाह दोषी भेटले आणि तिचं आयुष्यच बदलून गेलं. भाविना टेबल टेनिस खेळू लागली. भाविनाने खूप मेहनत घेतली. सगळं लक्ष खेळावर केंद्रित केलं. 2007 मध्ये तिने राष्ट्रीय स्पर्धेत पहिलं पदक पटकावलं. मग तिने मागे वळून बघितलं नाही. ती रिओ ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरली होती. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे तिला प्रत्यक्ष स्पर्धेत सहभागी होता आलं नाही. मात्र टोकियो पॅरालिम्पिक
स्पर्धेत मिळालेल्या संधीचं तिने सोनं केलं. स्वतःचं कौशल्य पणाला लावून खेळ केला आणि अंतिम
फेरीत दाखल झाली. यामुळे भारताचं पदक निश्चित झालं. मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर माणूस कोणत्याही अडचणींवर मात करू शकतो. शारीरिक अपंगत्व आलं म्हणून काय झालं, आपण स्वतःला सिद्ध करू शकतो, नाव कमवू शकतो हे भाविनाने दाखवून दिलं आहे. भाविनाच्या जिद्दीला सलाम करायलाच हवा.









