वार्ताहर/ जमखंडी
संपत्तीच्या मालमत्तेच्या वादातून एका कुटुंबातील चार भावांचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना शनिवार 28 रोजी रात्री तालुक्यातील मुधूरखंडी येथे घडली. हनुमंत मुदरड्डी (वय 45), मल्लप्पा मुदरड्डी (वय 35), बसप्पा मुदरड्डी (वय 37), ईश्वर मुदरड्डी (वय 35) अशी मृतांची नावे आहेत. घटनास्थळावरून संशयित आरोपी फरार झाले असून या घटनेने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, मुधूरखंडी येथील मुदरड्डी व फुटाणी कुटुंबीयांमध्ये मालमत्तेवरून वाद असल्याचे समाजते. दरम्यान, शनिवारी रात्री मुदरड्डी कुटुंबीय आपले काम आटोपून शेतातील घरात आले होते. त्यावेळी काही जणांनी अचानक मुदरड्डी भावांवर हल्ला करून त्यांचा निर्घृण खून केला. यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरारी झाल्याचे समजते. या घटनेनंतर फुटाणी कुटुंबीयांवर खुनाचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच जमखंडी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी जमखंडी सरकारी रुग्णालयात पाठवून देण्यात आले. यावेळी मुदरड्डी कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेची नोंद जमखंडी ग्रामीण पोलिसात झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.









