अफगाणमधील हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काबूल हल्ल्याची जबाबदारी घेतलेल्या आयएस खोरासान (आयएसआयएस-के) व तालिबान यांच्यातील मतभेद चव्हाटय़ावर आले आहेत. अमेरिकेने ड्रोन हल्ला करून त्यांच्या सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेतल्यामुळे आता ही संघटना आपले अन्यत्र बस्तान बसवू शकते. साहजिकच त्यांनी आपले तळ हलवल्यास त्यांच्यापासून भारताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यातच आता गुप्तचर यंत्रणांनीही आयएस-खोरासान भारतात पाय पसरू शकते, असा इशारा दिल्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
आयएस खोरासान भारतात आणि मध्य आशियात जिहादची तयारी करत आहे. दहशतवादी हल्ले करण्यासाठी ‘आयएसआयएस-के’ युवकांची भरती मोठय़ा प्रमाणावर करत आहे. खलीफा शासन स्थापन करणे हा त्यांचा मुख्य अजेंडा असून काश्मीरसह अन्य ठिकाणचे तरुण या संघटनेत सामील झाले आहेत. कट्टर इस्लामी विचारधारेच्या या युवकांना ‘आयएसआयएस-के’चे मोठे आकर्षण असल्याचे दिसून आले आहे. जम्मू काश्मीर भागात हल्ले करणाऱया पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-एöमोहम्मदने कंधार सीमा बेस अफगाणिस्तानमधील हेलमंद येथे हलविला आहे. यामुळे नजीकच्या काळात भारतात जिहादसारख्या घटना वाढतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.









