ऑनलाईन टीम / मुंबई
महाराष्ट्र सरकारने कोरोना निर्बंधामध्ये शिथीलता दिली असली तरी अद्याप धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली नाही. सरकारच्या या निर्णया विरोधात विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. दरम्यान, भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीने तर्फे सोमवार ३० ऑगस्टपासून राज्यव्यापी शंखनाद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी टीका केली आहे. सावंत या मुद्यावरुनच भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.
“केंद्र सरकारच्या इशाऱ्यानुसार महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ६० लाख रुग्ण येण्याची शक्यता आहे. निती आयोगानेही तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असतानाही सत्तेच्या हव्यासापोटी आंधळ्या भाजपाला पुन्हा मंदिरांचे राजकारण करायचे आहे. निती आयोग अनीतीमान शंखासूर भाजपाला समज कधी देणार?”, असं ट्वीट सचिन सावंत यांनी केलं आहे.
भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी तर्फे हे राज्यव्यापी शंखनाद आंदोलन होणार असल्याची घोषणा आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे. या आंदोलनाला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पाठींबा दिला आहे.
दरम्यान निर्बंधामध्ये शिथीलता दिल्यापासून राज्यात पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ होतानाचे चित्र आहे. केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यात ही रुग्ण संख्या जास्त दिसून येत आहे. यासंबंधी केंद्र सरकारनेही राज्यांना खबरदारीचा इशारा दिला आहे. तसेच देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा तज्ञांनी इशाराही दिला आहे. त्यामुळे गणेशोत्सव, दसरा-दिवाळी हे सण कोरोना नियमावलीत साजरे करावे लागतील असा स्पष्ट सूचनाही दिल्या आहेत.








