मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा
कणकवली / वार्ताहर:
शुक्रवारी रात्री उशिरा कणकवली येथे दाखल केंद्रीय लघू, सुक्ष्म व मध्यमउद्योगमंत्री नारायण राणे यांच्या जनआशिर्वाद यात्रेदरम्यान भाजप तसेच शिवसेनेच्याही कार्यकर्त्यांनी जमाव करून जोरदार घोषणाबाजी केली. याबाबत कणकवली पोलिसांकडून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५, भा.दं.वि. कलम १८८, १४३ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबतच्या दोन स्वतंत्र फिर्यादी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे व पोलीस उपनिरीक्षक अनमोल रावराणे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार रात्री ८ ते ११ या दरम्यानच्या काळात मिरवणूक काढून, शिवसेना कार्यालयानजीक बेकायदा जमाव करून अनेक आक्षेपार्ह घोषणाबाजी केल्याप्रकरणी शिवसेनचे आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, कन्हैया पारकर, राजू राठोड वगैरे १५ ते २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनीही बेकायदा जमाव करून, मिरवणूक काढून येथील नरडवे चौक येथे आक्षेपार्ह घोषणाबाजी केली. त्यानुसार भाजपचे आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे, सुरेंद्र कोदे वगैरे ४० ते ५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती कणकवली पोलिसांनी दिली.









