पोलीस आयुक्तांचा आदेश
प्रतिनिधी /बेळगाव
सीईटी परीक्षा 30 ऑगस्ट रोजी होणार असून परीक्षा केंद्रापासून 200 मीटर अंतरापर्यंत जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी या संबंधीचा आदेश दिला आहे.
टिळकवाडी येथील गोगटे विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात या परीक्षा होणार आहेत. 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत सीआरपीसी कलम 144 अन्वये परीक्षा केंद्रापासून 200 मीटर अंतरापर्यंत जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. परीक्षेच्या काळात परिसरातील झेरॉक्स सेंटर व सायबर कॅफे बंद ठेवण्याची सुचना देण्यात आली आहे.
परीक्षा केंद्राजवळ पाचहून अधिक जणांनी गटागटाने फिरु नये. घातक शस्त्रs बाळगू नये, अशी सूचना पोलीस आयुक्तांनी दिली असून जर कोणाजवळ शस्त्रs किंवा स्फोटके आढळून आल्यास संबंधीतावर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. परीक्षेच्या काळात या परिसरात ध्वनीक्षेपकाचा वापर करणे, गाणी वाजविणे, वाद्य वाविण्यावरही बंदी असणार आहे. यापूर्वी परवानगी घेतलेल्या कार्यक्रमांना मुभा असणार आहे.
अतिरिक्त बससेवा
सीईटी परीक्षेच्या पार्श्वभूमिवर परिवहन मंडळाने अतिरिक्त बस सेवा पुरविण्याचे जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना त्रास होवू नये यासाठी हुबळी-धारवाड, हावेरी, गदग, कारवार, बागलकोट, बेळगाव, चिकोडी विभागातून मागणीनुसार अतिरिक्त बस पुरविण्याच्या सूचना अधिकाऱयांना करण्यात आल्या आहेत.









