विकेंड कर्फ्यूची गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
प्रतिनिधी /बेळगाव
शनिवारी व रविवारी विकेंडच्यावेळी होणारी गर्दी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने राजहंसगडावरही पर्यटकांना बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी यासंबंधी एक आदेश जारी केला आहे. केवळ विकेंडच नव्हे तर सार्वजनिक सुटीदिवशीही पर्यटकांना बंदी असणार आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. राजहंसगडावर केवळ बेळगावातूनच नव्हे तर महाराष्ट्रातूनही पर्यटक मोठय़ा संख्येने येतात. त्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढण्याचा धोका आहे. हे लक्षात घेऊन बंदीचा आदेश जारी करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱयांनी म्हटले आहे.
नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून यापुढे शनिवारी, रविवारी व सार्वजनिक सुटीदिवशी राजहंसगडावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली असून पोलीस आयुक्त, प्रांताधिकारी व तहसीलदारांवर या आदेशाची अंमलबजावणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱयांविरुद्ध कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे. गोकाक फॉल्स, गोडचिनमलकीसह जिल्हय़ातील वेगवेगळय़ा पर्यटन स्थळांवर यापूर्वीच बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र, कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सौंदत्ती यल्लम्मा देवी, जोगुळभावी सत्यम्मा देवी, चिंचली मायक्का देवी यासह अनेक प्रमुख मंदिरांमध्ये देवदर्शनही बंद ठेवण्यात आले आहे.









