क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन ऑफ गोवातर्फे आयोजित केलेल्या राष्ट्रीय सीनियर किकबॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन आज 26 ऑगस्टपासून सुरू होत आहे. 29 ऑगस्टपर्यंत चालणारी ही स्पर्धा म्हापसा येथील पेडे इनडोअर संकुलात होईल.
य स्पर्धेत विविध राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेश आणि पॅरामिलिट्री फोर्सचे खेळाडू भाग घेतील. सुमारे 1500 पुरूष आणि महिला खेळाडू या स्पर्धेत आपले कसब दाखविणार असल्याचे वाको इंडिया किकबॉक्सिंग संघटनेचे सचिव संजयकुमार आणि चेअरमन अभिषेक जैन यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. या स्पर्धेची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष सागर सुर्वे म्हणाले.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी कोविड महामारीसंदर्भातील सर्व नियमांचे पालन करण्यात येणार असल्याचे आयोजन समितीचे चेअरमन सिद्धेश नाईक म्हणाले. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी असलेल्या नियमांचे पालन करण्यात येणार असल्याचे वाको इंडिया किकबॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष संतोषकुमार अगरवाल म्हणाले. स्पर्धा पॉईंट फाईट, लाईट काँटेक्ट, किक लाईट, फुट काँटेक्ट, लो कीक, के ऑन रूल्स आणि म्युझिकल फॉर्म्स अशा सात गटात खेळविण्यात येईल. या स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीवरून आगामी आशियाई, विश्व चॅम्पियन आणि सहाव्या आशियाई इनडोअर गेम्समध्ये भाग घेणाऱया भारतीय संघाची निवड करण्यात येईल.









