तत्कालीन दुय्यम निबंधकांसह 8 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ गुहागर
जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार गुहागर तालुक्यात जोरात सुरू असताना 2009 मध्ये झालेल्या जमीन विक्रीमध्ये मुळ जागामालकाऐवजी बनावट जागा मालक उभे करून जमिनीची विक्री केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यामध्ये तत्कालीन दुय्यम निबंधकासह 8 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी किशोर किसन जाधव (42), पंकज रजनीकांत खेडेकर (43), सुमित्रा किसन जाधव (मृत, 42), संतोष किसन जाधव (45), कृष्णा गणपत जाधव (मृत, 46, सर्व रा. गिमवी), भैरूमल सोगालाल ओसवाल (47, रा. चिपळूण), अमित विश्वपाल चव्हाण (42, रा. गुहागर) व तत्कालिन दुय्यम निबंधक (नाव माहित नाही, वय अंदाजे 45) यांच्यावर भादंवि कलम 420, 419, 464, 465, 468, 471 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार हनुमंत नलावडे करत आहेत.
गुहागर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्य़ात गुहागर तालुक्यातील गिमवी येथील समीर राजाराम जाधव यांनी या बाबतची फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये 17 ऑगस्ट 2009 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत हा गुन्हा घडल्याची नोंद करण्यात आली आहे. फिर्यादीच्या सामाईक मालकीची सर्व्हे नं. 890 ही मिळकत आहे. या जमीन मिळकतीत फिर्यादी व फिर्यादीची आई यांच्याएवजी दुसरे बनावट इसम दुय्यम निबंधक गुहागर यांच्यासमक्ष उभे करून बनावट खरेदीखत तयार करून फसवणूक व ठकवणूक करून जमीन विक्री केल्याचे म्हटले आहे.









