प्रतिनिधी/ सातारा
सातारा नगरपालिकेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे साविआ व नविआ या दोन्ही आघाडय़ात पत्रक वॉर सुरू आहे. प्रत्येकजण आपण काय कामे केली याची जंत्री मांडत असताना 27 रोजी होणाऱया स्थायी समितीच्या सभेत तब्बल 350 विषय घेण्यात आले आहेत. सातारा विकास आघाडीने आपलेच विषय रेटल्याचा आरोप विरोधकांकडून होत असून आमचे विषय जाणीवपूर्वक डावललेले जात असल्याचेही नविआच्या नगरसेवकांचे म्हणणे आहे. एकुणच निवडणुकीच्या तोंडावर पालिकेत लगबग सुरू झाली आहे. दरम्यान, जी कामे झाले आहेत, ज्यांचे बिल अदा झालेत असे विषयही सभेच्या अजेंडय़ावर आहेत.
सातारा पालिकेची कोरोनामुळे स्थायी समितीची सभा होत नव्हती. दोन महिने झालेली नव्हती. तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीनंतर सभा काढण्यात आली असून ही सभा दि. 27 रोजी होत आहे. सभा ऑनलाईन असल्याने सभेत आवाज म्युट होण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे स्थायी समितीच्या सभेला 350 विषय घेण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व विषय मंजूर होणार परंतु त्यावर चर्चा मात्र अर्धवट राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सातारा पालिकेच्या स्थायी समितीमध्ये सर्व पदाधिकारी, विरोधी गटातील केवळ अशोक मोने यांचा समावेश आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या सभेमध्ये महत्वाच्या विषयांना मंजूरी दिली जाते. सातारा पालिकेच्या स्थायी समितीची सभा ही दोन महिने झालेली नसून दोन महिन्यांनी सभा काढण्यात आली आहे. दि. 27 रोजी सभा असल्याचे अंजेडा समितीतील सदस्यांना वाटप करण्यात आले. सभेचा अजेंडा पाहिला असता त्यावर 314 विषयांचा उल्लेख असून ऐनवेळचे विषय पकडून असे 350 विषय आहेत. यामधील बुहतांशी विषय हे यापूर्वी कामे झाली आहेत. त्यांचा समावेश आहे. ज्यांचे विषय घेण्यात आले आहेत ते नगरसेवक आपला विषय डावलला नाही ना याची खात्री करण्यासाठी विषय पत्रिका पाहून अभ्यास करत आहेत. दरम्यान, उद्या दि. 27 रोजी होणाऱया ऑनलाईन स्थायी समितीत आवाज दाबला जावू नये म्हणजे झाले. कारण पाठीमागच्या सभा अशाच झाल्याचा अनुभव काही नगरसेवकांनी बोलून दाखवला.








