वृत्तसंस्था/ टोकियो
पॅरालिम्पिक्सच्या पहिल्या दिवशी ब्रिटनची सायकलपटू सारा स्टोरेने आपल्या सुवर्णमय इतिहासात आणखी एका सुवर्णपदकाची भर घातली तर व्हीलचेअर रग्बीचे पॉवरहाऊस असलेल्या बलाढय़ ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या स्पर्धेतील पहिली दोन सुवर्णपदके ऑस्ट्रेलियन पॅराखेळाडूंनी मिळविली.
ऑस्ट्रेलियाची सायकलपटू पेजे ग्रीको ही या स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी पहिली खेळाडू ठरली. त्यानंतर सी 4, 3000 मी. वैयक्तिक परस्यूटमध्ये तिचीच संघसहकारी एमिली पेट्रिकोलाने ऑस्ट्रेलियाला दुसरे सुवर्ण मिळवून दिले. नियमित ऑलिम्पिकप्रमाणे पॅरालिम्पिक्सलाही कोव्हिडमुळे एक वर्षाने उशिरा सुरुवात झाली. कोव्हिडची धोक्याची टांगती तलवार असूनही पहिल्या दिवशी जलतरण व सायकलिंगमध्ये अनेक वर्ल्ड व पॅरालिम्पिक्स विक्रम मोडले गेले. पहिल्या दिवशी एकूण 24 सुवर्णपदके देण्यात आली. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या ग्रीकोने सी 1-सी 3 क्लास 3000 मी. वैयक्तिक परस्यूट सायकलिंगमध्ये चीनच्या वांग शाओमेईला मागे टाकत सुवर्ण पटकावले. प्राथमिक फेरीत तिने आपलाच विश्वविक्रम 9 सेकंदानी मागे टाकल्यानंतर अंतिम फेरीत आणखी एक सेकंद कमी वेळ घेत 3 मि. 50.815 सेकंदाचा तिने नवा विक्रम नोंदवला.

सारा स्टोरे ब्रिटनची सर्वोत्तम पॅरालिम्पियन होण्याच्या दिशेने वाटचाल करताना सी 5 क्लास 3000 मी. वैयक्तिक परस्यूटच्या प्राथमिक फेरीत तिने स्वतःचाच विश्वविक्रम मोडित काढला आणि अंतिम फेरीत जेतेपद मिळवित पॅरालिम्पिकमधील 15 वे सुवर्णपदक पटकावले. 43 वर्षीय साराने सलग चौथ्यांदा सुवर्ण मिळविले. माईक केनीने सर्वाधिक 16 सुवर्णपदके पटकावण्याचा ब्रिटिश विक्रम नोंदवला असून त्याला गाठण्यासाठी साराला फक्त एका पदकाची गरज आहे. केनीने 1976 ते 1988 या कालावधीत जलतरणमध्ये 16 सुवर्णपदके मिळविली होती. केनीचा हा विक्रम मोडण्याची ब्राझीलचा जलतरणपटू डॅनियल डायसलाही संधी असून शेवटची पॅरालिम्पिक खेळताना त्याला आणखी तीन सुवर्णपदके मिळवावी लागणार आहेत. मात्र पहिल्या दिवशी एस 5 पुरुषांच्या 200 मी. फ्री स्टाईलमध्ये त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या प्रकारात इटलीच्या फ्रान्सेस्को बोकार्डोने सुवर्ण मिळविताना नवा स्पर्धाविक्रम नोंदवला. डायसची आता एकूण 25 पॅरालिम्पिक पदके झाली आहेत.
व्हीलचेअर रग्बी या क्रीडाप्रकारात विद्यमान सुवर्णविजेत्या ऑस्ट्रेलियाला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसला. सलग तिसऱयांदा पोडियमवर येण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना सुरुवातीलाच हादरा बसला. डेन्मार्कने त्यांचा 54-53 अशा निसटत्या फरकाने पराभव केला.
बुधवारी पॅरालिम्पिकशी संबंधित 16 कोरोना बाधित आढळले असून त्यात दोन पॅराऍथलेट्सचा समावेश असल्याचे आयोजकांनी सांगितले. मात्र त्यांची नावे उघड करण्यात आली नाहीत. पॅरालिम्पिकशी संबंधित कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 176 झाली असून त्यापैकी अनेक जण जपानस्थित स्टाफ किंवा कंत्राटदार आहेत.









