वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी बुधवारी तालिबानसंबंधी महत्त्वाचे विधान केले आहे. तालिबानच्या नियंत्रणाखालील अफगाणिस्तानमधून कुठल्याही प्रकारच्या संभाव्य दहशतवादी कारवाया झाल्यास त्यांचा कठोरपणे बीमोड केला जाईल असे त्यांनी म्हटले आहे. याचबरोबर रावत यांनी ‘क्वाड’ देशांनी दहशतवादविरोधी जागतिक युद्धात सहकार्य वाढवायला हवे अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्जाचा भारताला अंदाज आला होता, पण ज्या वेगाने तेथे घडामोडी घडल्या ते चकित करणारे होते. तालिबान मागील 20 वर्षांमध्येही बदलला नसल्याचे रावत म्हणाले.
ऑब्जर्व्हर रिसर्च फौंडेशनकडून (ओआरएफ) आयोजित एका कार्यक्रमाला रावत यांनी अमेरिकेच्या हिंद-प्रशांत कमांडचे ऍडमिरल जॉन एक्विलिनो यांच्यासोबत संबोधित केले आहे. ऍडमिरल एक्विलिनो यांनी चीनच्या आक्रमक वर्तनाच्या संदर्भात भारतासमोर निर्माण होणाऱया आव्हानांचा उल्लेख केला. विशेषकरून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सार्वभौमत्वासोबत दक्षिण चीन समुद्र क्षेत्रात ‘मूलभूत सुरक्षा चिंते’संबंधी त्यांनी भाष्य केले आहे.
क्षेत्रात दहशतवादमुक्त वातावरण सुनिश्चित करण्यासाठी भारत प्रतिबद्ध आहे. अफगाणिस्तानातून भारतात पोहोचणाऱया कुठल्याही कारवायांना आम्ही दहशतादासारखेच सामोरे जाणार आहोत. क्वाड देशांकडून समर्थन मिळाल्यास, किमान दहशतवाद्यांची ओळख आणि दहशतवादविरोधी जागतिक युद्ध लढण्यासाठी गुप्त माहिती मिळाल्यास याचे स्वागत केले जावे असे मला वाटते. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे देश ‘क्वॉड’चे सदस्य असल्याचे रावत यांनी म्हटले आहे.
अफगाणिस्तानातून निर्माण होणाऱया दहशतवादी कारवायांचा भारतावर पडणाऱया संभाव्य प्रभावावरून देशाला चिंता आहे आणि अशी आव्हानांना तोंड देण्यासाठी आपत्कालीन योजना तयार करण्यात आल्या आहेत. संभाव्य दहशतवादी कारवायांचा विचार करून आम्ही आकस्मिक योजना राबवत आहेत, तसेच कुठल्याही प्रकारच्या कारवायांचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी आम्ही तयार आहोत. पण ज्या वेगाने अफगाणिस्तानात तालिबानचा कब्जा झाला, ते चकित करणारे होते. काही महिन्यांनी घडेल असा आमचा अनुमान होता असे रावत यांनी म्हटले आहे.
तालिबान बदलला नाही
तालिबान मागील 20 वर्षांमध्येही बदलला नाही आणि केवळ त्याचे सहकारी बदलले आहेत. 20 वर्षांपूर्वीच्या तालिबानमध्ये आणि आताच्या तालिबानमध्ये फारसा फरक पडलेला नसल्याचे रावत यांनी नमूद केले आहे. तालिबानच्या नियंत्रणाखालील अफगाणिस्तानातून लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यासारख्या विविध दहशतवादी संघटनांच्या कारवाया वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
हिंद-प्रशांत क्षेत्रासमोरील आव्हाने
ऍडमिरल एक्विलिनो यांनी व्यापक स्वरुपात हिंद-प्रशांत क्षेत्राच्या आव्हानांचा उल्लेख करत हे भविष्यातील सर्वात महत्त्वपूर्ण क्षेत्र असल्याचे म्हटले आहे. सर्वांसाठी सागरी संचाराच्या स्वातंत्र्याची अनुमती देणाऱया नियम आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर हल्ला निश्चितपणे सर्वात महत्त्वाच्या आव्हानांपैकी एक आहे. आर्थिक दबाव, भ्रष्टाचार याच्या देखील चिंता असल्याचे ते म्हणाले.









