भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती : प्रदेश भाजपच्या ‘रिशेडय़ुल’नंतर यात्रा
प्रतिनिधी / कणकवली:
केंद्रीयमंत्री नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा बुधवारपासून सिंधुदुर्गमध्ये सुरू होणार होती. मात्र, रत्नागिरीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रदेश कार्यकारिणाने ही यात्रा काही दिवसांसाठी स्थगित केली आहे. प्रदेश कार्यकारिणीने ‘रिशेडय़ुल’ दिल्यानंतर ही जनआशीर्वाद यात्रा होणार आहे. जिल्हय़ात मनाई आदेश असला, तरी जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी ही यात्रा प्रदेशच्या आदेशाने होणार आहे. तोपर्यंत प्रशासनालाही सुबुद्धी होईल. जनआशीर्वाद यात्रेला मिळणाऱया प्रतिसादाने बिथरलेल्या सत्ताधाऱयांनी ही कारवाई केली व मनाई आदेश लागू केला, असा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला.
येथील भाजप संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना तेली म्हणाले, सिंधुदुर्ग हे राणेंचे होमपीच आहे. मनाई आदेश असतानाही जिल्हय़ात सत्ताधारी नेते, मंत्री फिरतातच. जेव्हा केंद्रीय उद्योगमंत्री राणेंचा दौरा निश्चित होईल, तेव्हा जिल्हय़ातील मनाई आदेश मागे घेतला जाईल.
राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेसाठी जिल्हय़ात दिवाळी-दसरा सणासारखे उत्साही वातावरण झाले होते. यात्रेचे स्वागत करण्यासाठी सिंधुदुर्गातील भाजप कार्यकर्ते आणि जनता प्रचंड उत्साही आहे. तांत्रिक अडचणीमुळे यात्रा पुढे ढकलण्यात आली असून दोन दिवसांत यात्रेचे रिशेडय़ुल प्रदेश भाजपकडून कळविण्यात येणार आहे. कार्यकर्ते, जनता याबाबत विचारणा करीत आहे. कोकणला केंद्रीय मंत्रिमंडळात मिळालेल्या स्थानामुळे जनतेच्याही अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे ही यात्रा येईल व जनता आशीर्वादही देईल, असेही तेली म्हणाले.
राणेंना झालेली अटक सुडबुद्धीनेच
परिवहनमंत्री अनिल परब यांचा राणेंच्या अटकेबाबत पोलिसांवर दबाव टाकतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. यावरून राणेंना झालेली अटक ही सूडबुद्धीने केल्याचे सिद्ध होते. या प्रकाराबाबत जनतेत मोठी चीड आहे. कोकणी जनतेने मनात ठरविल्यावर काय होईल, हे लवकरच महाविकास आघाडी सरकारला समजेल. पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हावासीयांची फसवणूक करीत आहेत. सत्ताधारी केवळ विकास प्रकल्पाच्या घोषणा करतात, पण पूर्तता करीत नाहीत. सी-वर्ल्ड, आडाळी एमआयडीसी, नाणार प्रकल्पाला विरोध केला. केंद्रीय उद्योगमंत्री राणेंच्या माध्यमातून कोकणचा विकास होणार, हे स्पष्ट आहे. राणेंना केलेल्या अटकेची किंमत राज्य सरकारला कोकणी जनता मोजायला लावेल, असेही तेली म्हणाले. राणे हे जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहेत. आशीर्वाद घेण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज आहे, असे वाटत नाही. आमचा संघर्ष नाही, जनतेला त्रास व्हावा, अशी अपेक्षाही नाही. त्यामुळे रिशेडय़ुल येईपर्यंत प्रशासनाला सुबुद्धी सूचेल व मनाई आदेश मागे घेतले जातील, असेही तेली म्हणाले.









