सोव्हियत महासंघ तसेच तालिबानला या प्रांतात कधीच मिळाले नाही यश
तालिबानला अफगाणिस्तानच्या सत्तेवर कब्जा करता आला आहे, पण पंजशीर प्रांत अद्याप त्याच्यासमोर सर्वात मोठे आव्हान म्हणून उभा ठाकला आहे. या अभेद्य प्रांतात तालिबानला कधीच शिरकाव करता आलेला नाही. पंजशीरच्या दऱयाखोऱया आता तालिबानच्या विरोधाचे प्रतीक ठरत आहेत. पंजशीरचा शेर (सिंह) शाह मसूदचा बालेकिल्ला राहिलेल्या या भागात आता विरोधाचा झेंडा त्यांचे पुत्र अहमद मसूद यांनी हाती घेतला आहे. त्यांच्यासोबत अफगाणचे उपाध्यक्ष राहिलेले अमरुल्ला सालेह देखील आहेत.
पंजशीर खोऱयाचे भौगोलिक स्थान
काबूलपासून 150 किलोमीटर अंतरावर असलेले पंजशीर खोरे हिंदुकुश पर्वतरांगांच्या नजीक आहे. उत्तरेत पंजशीर नदी याला पर्वतरांगांपासून वेगळे करते. तर दक्षिणेला कुहेस्तानच्या पर्वतरांगेने या खोऱयाला वेढलेले आहे. या पर्वतरांगा वर्षभर हिमाच्छादित असतात. या भागाचे भौगोलिक स्थानच शत्रुसाठी सर्वात मोठे आव्हान ठरते.
चांदीच्या खाणींसाठी होता प्रसिद्ध
हे खोरे कधीकाळी चांदीच्या खाणींसाठी प्रसिद्ध राहिले आहे. 1985 पर्यंत या खोऱयात 190 कॅरेट क्रिस्टल आढळून आले होते. येथे आढळून येणाऱया क्रिस्टलची गुणवत्ता कोलंबियाच्या मुजो खाणींसारखीच असल्याचे सांगण्यात येते. मुजो खाणींमधील क्रिस्टलला जगात सर्वोत्तम मानले जाते.
पंजशीरचा इतिहास
1980 च्या दशकात सोव्हियत संघाचे शासन, त्यानंतर 1990 च्या दशकात तालिबानच्या पहिल्या राजवटीदरम्यान अहमद शाह मसूदने या खोऱयाला शत्रूच्या तावडीत सापडू दिले नव्हते. पंजशीर पूर्वी परवान प्रांताचा हिस्सा होता. 2004 मध्ये पंजशीरला स्वतंत्र प्रांताचा दर्जा मिळाला. 1.5 लाख लोकसंख्या असलेल्या या भागात ताजिक समुदायाचे बाहुल्य आहे. मे महिन्यात तालिबानने एका मागोमाग एका प्रांतावर कब्जा करण्यास सुरुवात केल्यावर अनेक लोकांनी पंजशीरमध्ये आश्रय घेतला आहे. पूर्वीप्रमाणेच हे खोरे तालिबानसमोर आव्हान निर्माण करणार अशी अपेक्षा लोकांना आहे.
विदेशातून मदत
1980 च्या दशकात सोव्हियत संघाच्या विरोधातील लढाईत पंजशीरमधील लढवय्यांना अमेरिकेने शस्त्रास्त्रs देऊन मदत केली होती. तर आर्थिक मदत पाकिस्तानच्या माध्यमातून मिळत होती. त्यानंतर तालिबान सत्तेवर आल्यावर तेथे सक्रीय नॉर्दर्न अलायन्सला भारत, इराण आणि रशियाकडून मदत मिळाली. त्या काळात अफगाणिस्तानचा बहुतांश उत्तरेकडील भाग तालिबानच्या कब्जापासून दूरच राहिला. यावेळी तालिबान पूर्वीच्या तुलनेत अधिक मजबूत झाला आहे. पंजशीर या एकमेव प्रांतावर त्याचा अद्याप कब्जा झालेला नाही. तालिबानला चीन, रशिया आणि इराणचे समर्थन आहे. अहमद शाह मसूद यांचे पुत्र आणि पंजशीरमधील लढाईचे नेतृत्व करणाऱया अहमद मसूद यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मदत मागितली आहे.
मागील 20 वर्षांमध्ये काय घडले?
पंजशीर प्रांतात मागील 20 वर्षांमध्ये काही प्रमाणात विकासकामे झाली आहेत. खोऱयात आधुनिक रस्ते तयार झाले आहेत. अफगाण सरकारच्या काळात येथे कुठलाच रक्तपात झाला नव्हता. 512 गावे आणि 7 जिल्हय़ांच्या या प्रांतात वीज आणि पाण्याच्या पुरवठय़ाची व्यवस्था नाही. पंजशीरच्या सीमेला लागून असलेल्या प्रत्येक भागावर तालिबानचा कब्जा झाला आहे. तालिबान आवश्यक सामग्रीची वाहतूक रोखू शकतो, अशा स्थितीत या भागाला आंतरराष्ट्रीय मदतीची गरज भासेल.









