प्राणिसंग्रहालयाकडून प्रवेशावर बंदी
चिम्पाझीसोबत प्रेमाचे एक अजब प्रकरण समोर आले आहे. एका महिलेचे चिम्पाझीवर प्रेम जडले. दोघेही परस्परांना फ्लाइंग किस करत आणि प्राणिसंग्रहालयात भेटत. पण प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाला महिला आणि चिम्पाझीचे हे प्रेम मान्य नाही.
हे प्रकरण बेल्जियममधील एका प्राणिसंग्रहालयातील आहे. तेथे एडी टिमरमॅन्स नावाची महिला एका चिम्पाझीला भेटायला वारंवार यायची. एडी सुमारे 4 वर्षांपासून या प्राणिसंग्रहालयातील 38 वर्षीय चीता नावाच्या चिम्पाझीला भेटण्यास येत होती. आपले चिम्पाझीवर प्रेम असल्याचे तिचे म्हणणे आहे.

दोघेही कथितपणे हातखुणांद्वारे परस्परांशी संवाद साधतात. परस्परांना फ्लाइंग किसही करतात. तर दुसरीकडे अन्य चिम्पाझी चितापासून अंतर राखू लागले आहेत. पण याविषयी प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाला समजल्यावर महिलेच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. चिम्पाझीवर याचा चुकीचा प्रभाव पडू शकतो असे व्यवस्थापनाचे मानणे आहे.
अन्य प्राण्यांसोबत सामाजिक स्तरावर चिम्पाझीसाठी हा प्रकार योग्य नाही. महिलेच्या वर्तनात सुधारणा न झाल्यास भविष्यातही तिला प्राणिसंग्रहालयात प्रवेश दिला जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
परस्परांना पाहण्याची अनुमती देण्यात न आल्यास मी तसेच चिम्पाझी दोघेही त्रस्त होऊ. मी त्या प्राण्यावर प्रेम करते आणि तोही माझ्यावर प्रेम करतो असे एडीने म्हटले आहे.
प्रवेशबंदीचा निर्णय माझ्यावर अन्याय करणारा आहे. मी कुठल्याच प्राण्याला नुकसान पोहोचवित नसल्याचे ती सांगते. या घटनेवरून शहरात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. कुणी महिलेला प्राणिप्रेमी ठरवत आहेत, तर कुणी तिला वेडसर म्हणत आहेत.









