ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यातील वाकड येथील एका व्यावसायिकाच्या बँक खात्याची माहिती हॅक करीत सायबर चोरटय़ांनी त्यांच्या खात्यातून 38 लाख चार हजार रुपये लांबवले आहेत. व्यावसायिकाने या व्यवहाराबातचे ओटीपी, अलर्टस, मेसेज किंवा मेल कोणालाही पाठवलेले नाहीत. विशेष म्हणजे मोबाईल बँकिंग वापरत नसताना देखील हा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काळेवाडी फाटा येथे राहणाऱया एका व्यावसायिकाने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाकड पोलिस ठाण्यात विविध कलमांनुसार चोरटय़ांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे कंपनी सल्लागार म्हणून काम करतात. त्याचे एचडीएफसी बँकेत वैयक्तिक आणि फर्मचे असे दोन खाते आहेत. या दोन्ही खात्यातून मिळून अज्ञाताने 38 लाख 4 हजार रुपयांची रक्कम लांबवली आहे. संबंधित घटना 17 जुलै रोजी उघडकीस आली आहे.
15 जुलै रोजी त्यांना त्यांच्या खात्यातून दोन लाख 14 हजार रुपये वर्ग झाल्याचा मेसेज आला. त्यामुळे त्यांनी बँकेतील शिल्लक रक्कम तपासली असता त्यांना दोन्ही खात्यातून 38 लाख चार हजार रुपये वर्ग झाल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी त्वरित याबाबत पोलिसांत तक्रार दिली.
या व्यवहाराबातचे ओटीपी, अलर्टस, मेसेज, मेल किंवा बँक खात्याची माहिती मी कोणालाही पाठवलेले नाही. तसेच मी मोबाईल बँकिंग वापरत नसताना देखील हा प्रकार घडला आहे, असे व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे. वाकड पोलिस या गुह्याबाबत अधिक तपास करीत आहेत.