पारंपरिक पद्धतीने पूजेनंतर नारळ समुद्राला अर्पण, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांची उपस्थिती
प्रतिनिधी /काणकोण
अखिल गोवा क्षत्रिय पागी समाजातर्फे राजबाग, तारीर येथील समुद्रकिनाऱयावर समुद्राला नारळ अर्पण करून पारंपरिकरीत्या नारळी पौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला. उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, उपसभापती इजिदोर फर्नांडिस, नगराध्यक्ष सायमन रिबेलो आणि मच्छीमार समाजातील भगिनी व असंख्य समाजबांधवांच्या उपस्थितीत हा सण साजरा करण्यात आला.
त्यापूर्वी तारीर येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात मच्छीमार समाजातील महिलांनी आणलेल्या नारळाची पांरपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर क्षत्रिय पागी समाजाचे अध्यक्ष अशोक धुरी, काणकोणच्या उपनगराध्यक्षा अमिता पागी, माजी नगराध्यक्ष रत्नाकर धुरी, दिवाकर पागी, नगरसेवक लक्ष्मण पागी, धीरज गावकर, शुभम कोमरपंत, पैंगीणचे पंच रूद्रेश नमशीकर, दीक्षा पागी, सरिता पागी, लोलयेचे माजी सरपंच शैलेश पागी, ऍड. अनुप कुडतरकर, माजी अध्यक्ष सूरज पागी आणि समाजाचे अन्य पदधिकारी उपस्थित होते.
समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी मच्छीमार समाज मागच्या कित्येक वर्षांपासून राबवत असलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. कोरोना महामारीच्या काळात देखील गोव्याचे मुख्यमंत्री गरजू लोकांना विविध सवलती देण्याकडे लक्ष देत असून मच्छीमार समाजाने मांडलेल्या समस्यांवर योग्य तो विचारविनिमय केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आजवर आपल्यावर जो लोकांनी विश्वास ठेवला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच, मच्छीमार समाजातील ज्या महिलांना कोरोना महामारीच्या काळात अडचणींचा सामना करावा लागला त्या सर्वांना देय असलेली आर्थिक मदत गणेश चतुर्थीपूर्वी दिली जाईल, असे उपसभापती फर्नांडिस यांनी सांगितले. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी पुढील पाच वर्षे आपल्याला द्यावीत, असे आवाहन त्यांनी केले.
क्षत्रिय पागी समाज भगिनीनी सादर केलेल्या स्वागत गीतानंतर अशोक धुरी यांनी स्वागत केले. यावेळी नगराध्यक्ष रिबेलो, दिवाकर पागी, रत्नाकर धुरी, सूरज पागी, पंच ऍड. कुडतरकर, नमशीकर यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन प्रसाद पागी यांनी केले, तर सर्वानंद पागी यांनी आभार मानले.









