व्होडाफोन आयडिया, एअरटेलना सरकारकडून पॅकेज – व्होडाफोन आयडियाची थकबाकी 58 हजार कोटीवर
वृत्तसंस्था/ मुंबई
दूरसंचार क्षेत्रामध्ये आगामी काळात निर्माण होणाऱया एकाधिकारशाहीला रोखण्यासाठी सरकार व्होडोफोन-आयडिया आणि एअरटेल या कंपन्यांना पॅकेज देण्याची शक्यता आहे. उपलब्ध माहितीनुसार सरकार ऍडजेस्ट ग्रॉस रेव्हेन्यू (एजीआर) पेमेन्टची रक्कम जमा करण्याचा कालावधी वाढवून 20 वर्षांपर्यंत करण्याचा अंदाज मांडला जात आहे.
व्होडाफोन आयडियात गुंतवणूक कधी व कशी होणार तसेच प्रति ग्राहकांची कमाई वाढणार का?, यासोबत 5जी साठी आवश्यक योजना राहणार आहे का? या बाबीचा सरकार विचार करणार आहे. व्होडाफोन आयडियावर 1.92 लाख कोटी रुपयांची देणी शिल्लक आहे, यामधील 58,254 कोटी एजीआरची थकबाकी आहे. या अगोदर कंपनीने एजीआरसाठी 7,854 कोटी रुपये दिलेले आहेत. एकूण एजीआरची थकबाकी येत्या 10 वर्षांपर्यंत जमा करावी लागणार आहे.
एअरटेलची थकबाकी
या कंपनीची एजीआर थकबाकी ही 43,980 कोटी रुपये बाकी आहे. यामधील 18 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. मार्च 2022 मध्ये 4,500 कोटी रुपयांची रक्कम देणे आहे. एजीआरची रक्कम देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार कंपन्यांना 10 वर्षांची मर्यादा दिली आहे. सरकार पुन्हा हा कालावधी वाढवून 20 वर्षे करणार आहे, असे कळते या विषयासंदर्भात व्होडाफोन व आयडियाचे व्यवस्थापकीय संचालक रविंदर ठक्कर आणि अन्य अधिकाऱयांनी दूरसंचार सचिव अंशू प्रकाश यांच्यासोबत चर्चा केली आहे. रिलायन्स जिओ वगळता अन्य कंपन्यांची ग्राहक संख्या दिवसागणिक घटत असल्याचे दिसून येत आहे.
कायदेशीर सल्ला घेणार
सरकार याबाबत कायदेशीर सल्ला घेणार असल्याची माहिती आहे. त्यानंतरच एजीआर पेमेन्ट जमा करण्याचा कालावधी वाढविण्याची शक्यता आहे. कारण 10 वर्षांची मर्यादा ही सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे. हा कालावधी येत्या 2031 रोजी पूर्ण होणार आहे. त्यामुळे यापुढील निर्णय न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे.









