प्रतिनिधी / सातारा :
साडेसात किलो सोने चोरी प्रकरणाच्या तपासाकामी गेल्या 15 दिवसांपासून केरळ पोलीस साताऱ्यात तळ ठोकून होते. याप्रकरणी संशयित निखिल जोशी हे नाव वगळता अजून कोणाचे नाव पुढे आले नाही. तसेच गेल्या दोन दिवसांपूर्वी केरळ पोलीस परत गेल्याने तपासाचे काय झाले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु 15 दिवस केरळ पोलिसांनी काय तपास केला, यांची ठोस माहिती सातारा पोलिसांकडे नसल्याचे पोलीस दलाकडून सांगण्यात येत आहे.
केरळ सोने चोरी प्रकरणाचे धागेदोरे साताऱ्याशी जोडल्याने केरळ पोलीस साताऱ्यात दाखल झाले. केरळ पोलिसांचा तपासही सुरू झाला. या प्रकरणात अनेक नामवंत व्यक्तीची नावे पुढे येणार असा अंदाज व्यक्त झाला. साताऱ्यातून निखिल जोशी याला केरळ पोलीसांनी अटक केली. निखिल जोशीने चोरीतील काही सोने साताऱ्यातच वितळवल्याचे व विकल्याचे समोर आले आहे. निखिल जोशी मूळचा साताऱ्याचा नाही. मात्र त्याचे अनेक वर्षापासून साताऱ्यातील नामवंत व्यक्तीसोबत चांगले संबंध आहेत. यामुळे या प्रकरणात साताऱ्यातील प्रतिष्ठीत व्यक्तींचा समावेश आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी अनेकांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार लटकत आहे.