भाजप नेते आशिष शेलार यांची ठाकरे सरकारवर टीका
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात नेत्यांच्या मुलांची सुरक्षा वाढली आणि जनता मात्र असुरक्षित असल्याचा टोला भाजपाचे महाराष्ट्र विधानसभेचे मुख्य प्रतोद तथा माजी मंत्री ऍड. आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला लगावला.
सोमवार आणि मंगळवारी भाजप नेते आशिष शेलार सोलापूर जिह्याच्या दौऱयावर आले आहेत. शेलार यांचे भाजपच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज चौक येथे मोठ्या जल्लोषात फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष विक्रम देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृहनेते शिवानंद पाटील, बिज्जू प्रधान आदींसह विविध कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंद्रपूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. सरकारचा पोलिसांवर वचक नसल्याने लोक सुरक्षित नाहीत. नेत्यांच्या मुलांची सुरक्षा वाढली असून जनतेची कमी केली आहे. कायदा व सुव्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.
दहीहंडीला परवानगी द्या अन्यथा आंदोलन
मुख्यमंत्री झूमद्वारे बैठक घेत आहेत. ज्यांचे दोन लस डोस झालेत त्यांना जास्त उंच नाही व शहरभर नसलेले दहीहंडीचे कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी द्यावी. कोरोना नियम पाळून दहीहंडीला परवानगी न दिल्यास आंदोलनाचाही इशारा यावेळी देण्यात आला.









