अर्धवट कामामुळे वाहतूक कोंडीची समस्या

प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हा रुग्णालयासमोरील क्लब रोडचा विकास करण्यात येत आहे. मात्र सदर रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने दुतर्फा वाहने पार्क करण्यात येत आहेत. एका बाजूला दुचाकी आणि दुसऱया बाजूला चारचाकी वाहने पार्क करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनधारकांना तासन्तास ताटकळत थांबावे लागते.
शहरातील विविध रस्त्यांचा विकास स्मार्टसिटी योजनेअंतर्गत करण्यात येत आहे. मात्र सदर विकासकामांचा फटका वाहनधारकांना बसत आहे. क्लब रोडच्या विकासाचे काम हाती घेऊन वर्ष उलटले. पण टप्प्याटप्प्याने करण्यात येणारे काम अद्याप अपूर्ण आहे. विश्वेश्वरय्या चौक ते राणी चन्नम्मा चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू करून तीन महिने झाले. सदर रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले. पण गटारीचे बांधकाम झाले नसल्याने हे काम हाती घेण्यात आले आहे. गटारी बांधकाम करण्यासाठी एका बाजूने खोदाई करण्यात आली आहे. तसेच गटारी शेजारी बांधकाम साहित्य ठेवण्यात आले आहे. पण काम संथगतीने सुरू असल्याने अडचण निर्माण झाली आहे. व्यावसायिकांना वाहने पार्क करण्यासाठी जागा नसल्याने रस्त्यावर वाहने पार्क करण्यात येत आहेत. तसेच ग्राहकदेखील वाहने पार्क करीत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या समोर मोठय़ाप्रमाणात जागा असल्याने त्याठिकाणी चारचाकी वाहने पार्क करण्यात येत होती. मात्र रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आल्याने वाहने पार्क करण्यास अडचण निर्माण होत आहे. रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱयाची वाहने तसेच परिसरातील व्यावसायिकांची चारचाकी वाहने जिल्हा रुग्णालयाच्या समोरील बाजूस मुख्य रस्त्यावर पार्क करण्यात येत आहेत. त्यामुळे एका बाजूला दुचाकी आणि दुसऱया बाजूला चारचाकी वाहने पार्क करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. तसेच याठिकाणी रुग्णालयात येणारे नागरिक आणि ग्राहकदेखील रस्त्यावर वाहने पार्क करून निघून जात असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहनधारकांना ताटकळत बसावे लागते. याठिकाणी रहदारी पोलीसांची नियुक्ती करण्यात येते, पण बऱयाचवेळा रहदारी पोलीस या ठिकाणाहून गायब असतात. परिणामी अन्य वाहनधारकांची गैरसोय होते. वाहतूक कोंडीमुळे पादचाऱयांनादेखील ये-जा करताना अडथळय़ांना सामोरे जावे लागत आहे. येथील समस्येचे निवारण करण्यासाठी स्मार्टसिटी योजनेअंतर्गत अर्धवट असलेली कामे तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. पण स्मार्टसिटी कंपनी आणि रहदारी पोलीस प्रशासनाने येथील समस्येकडे दुर्लक्ष केल्याने ही समस्या गंभीर बनली आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन समस्येचे निवारण करावे, अशी मागणी होत आहे..









