जागतिक बाजारातील विक्रीचा प्रभाव – टाटा स्टील सर्वाधिक नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील प्रारंभापासून भारतीय भांडवली बाजारात नव्या विक्रमासोबत सेन्सेक्स व निफ्टीने उच्चांकी कामगिरी केल्याचे पहावयास मिळाले आहे. परंतु जागतिक बाजारातील विक्रीच्या प्रभावामुळे आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी सेन्सेक्स घसरणीत राहिल्याचे दिसून आले. दिवसभरातील कामगिरीनंतर टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि कोटक बँक यांचे समभाग अधिक प्रभावीत होत सेन्सेक्स तब्बल 300 अंकांनी कोसळला आहे.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स जवळपास 300.17 अंकांनी घसरुन निर्देशांक 55,329.32 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 118.35 अंकांच्या घसरणीसोबत 16,450.50 वर निर्देशांक बंद झाला आहे.
दिवसभरात सेन्सेक्समधील कंपन्यांपैकी टाटा स्टीलचे समभाग सर्वाधिक आठ टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. यासह स्टेट बँक, डॉ.रेड्डीज लॅब, कोटक बँक , सन फार्मासह बजाज ऑटो आणि लार्सन ऍण्ड टुब्रो यांचे समभाग प्रभावीत झाले आहेत. दुसऱया बाजूला हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेन्ट्स, नेस्ले इंडिया आणि बजाज फायनान्स यांचे समभाग लाभात राहिले आहेत.
जागतिक बाजारातील विक्रीच्या दबवामुळे देशातील बाजारात मोठय़ा प्रमाणात अस्थिर वातावरण राहिल्याचे दिसून आले. यामध्ये एमएमसीजी कंपन्यांसह अन्य कंपन्यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत. निफ्टीमधील धातूशी संबंधीत कंपन्यांसह रियल्टी, सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि औषध कंपन्यांचे समभाग घसरणीत राहिल्याची माहिती आहे.
अन्य बाजारांमधील वातावरणात आशियातील बाजारांमध्ये चीनचा शांघाय कम्पोजिट, हाँगकाँगचा हँगसेंग, जपानचा निक्कीसह दक्षिण कोरियाची कॉस्पी यांना मोठे नुकसान झाले आहे. दुपारपर्यंत युरोपीयन बाजार नुकसानीत राहिला होता.
सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याच्या कारणामुळे व लसीकरणाने पकडलेल्या तेजीने भारतामधील आर्थिक स्थितीत सुधारण्यास मदत होणार असल्याने येत्या काही दिवसात आंतरराष्ट्रीय वातावरण वगळता देशात गुंतवणूकदारांना पोषक वातावरण राहणार असल्याचा अंदाज अभ्यासकांनी यावेळी व्यक्त केला आहे.