सातारा / प्रतिनिधी :
सातारा जिल्ह्यात पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते. या शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेतले जाईल आणि घेतलेल्या उत्पन्नाची निर्यात कशी करता येईल, यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. त्याकरता शेतकऱ्यांचे प्रशिक्षण घेवून हा उपक्रम विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी विजय माईनकर यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.
जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी विनायक पवार यांच्या बदलीनंतर रिक्त जागी बदलून आलेले विजय माईनकर यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. सकाळपासून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात कामाचा धडाका त्यांनी लावला होता. विजय माईनकर यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेत कृषी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तसेच त्यांनी वाई येथील ही कार्यालयात कामकाज पाहिले आहे. पदभार स्वीकारताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्याकडे आढावा दिला. तसेच कृषी विभागाच्या कामकाजाचीही माहिती घेतली.
त्यांच्यासोबत संवाद साधला असता ते म्हणाले, सातारा जिल्ह्यातील शेतकरी जास्तीत जास्त निर्यात शेती कसे करतील, याकरता प्राधान्य दिले जाणार आहे. शेतीतून जास्त उत्पन्न काढल्यानंतर ते निर्यांत कसे करता येईल याकडे पाहिले जाणार आहे. त्याकरता प्रशिक्षण देण्यात येणार आहे. भाजीपाला, फळे यांचे उत्पादन घेण्याबरोबर ते विक्री करण्यासाठी काम करण्यात येणार आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील खताची टंचाई शेतकऱ्यांना जाणवणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. त्याकरता बफर स्टॉक किती आहे. विक्रेत्यांकडे किती स्टॉक आहे, याची माहिती घेवून टंचाई उदभवणार नाही याबाबत सूचना दिल्या जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.









