दोडामार्ग – वार्ताहर
‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ या सेवाभावी संस्थेच्या वतीने बुधवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी दोडामार्ग येथे मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्वसनविकार, दमा, जुना व ऍलर्जिक खोकला व कफविकारांवर हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष सतीश लळीत यांनी प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोडामार्ग शहराच्या मुख्य चौकाजवळ असलेल्या पिंपळेश्वर सभागृहामध्ये हे शिबिर दि. 25 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत होणार आहे. या शिबिरामध्ये संस्थेच्या उपाध्यक्ष व सिंधुदुर्गनगरी येथील कोविड केअर सेंटरच्या आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. सई लळीत, कणकवली येथील डॉ. संदीप महेंद्र नाटेकर, डिचोली, गोवा येथील डॉ. वसुधा मेस्त्री रुग्णांची तपासणी करतील. दोडामार्ग परिसरातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिबिरामध्ये तपासणीसाठी येऊ इच्छिणाऱ्यांनी शक्यतो 9422413800 या व्हाट्सअप क्रमांकावर नाव व गावासह नोंदणी करावी. नोंदणी न केलेल्यानाही शिबिराचा लाभ घेता येईल. मात्र नोंदणी केलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल. शिबिराला उपस्थित राहणा-यांनी कोविडच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच सर्वांनी मास्क लावणे बंधनकारक आहे.
या शिबिरासाठी दोडामार्ग नगरपरिषदेने सहकार्य केले असून मुंबई येथील राजीव नाखरे व अंकिता नाखरे यांचे यांच्या सौजन्याने हे शिबिर होत आहे. शिबिराचे उद्घाटन सकाळी 10 वाजता दोडामार्ग नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांच्याहस्ते होणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा, असे आवाहन ‘घुंगुरकाठी’ संस्थेने केले आहे.









