ऑगस्ट 23 पासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले यासाठी मार्गसूची जारी करण्यात आली आहे.
मुलांनी पिण्याचे पाणी, जेवण आपल्या घरातूनच आणावे. सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी 10 ते दुपारी 1.30 व शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 12.30 पर्यंत वर्ग भरविण्यात येणार आहेत. कोविड-19 ची नियमावली पाळून विद्यार्थ्यांना शाळेला यावे लागणार आहे. यासाठी पालकांची परवानगी गरजेची आहे. शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी शाळा सुरू करण्याची घोषणा केली असली तरी विद्यार्थ्यांसाठी हजेरी सक्तीची नाही. ऑनलाईन क्लासच्या माध्यमातूनही हजेरी लावता येणार आहे. कोरोनाची रुग्णसंख्या अधिक असलेल्या मंगळूर, चिक्कमंगळूर, उडुपी, कोडगू व हासन या पाच जिल्हय़ात अद्याप शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही.
एक-दीड वर्षे शाळा उघडल्या नाहीत. चालू शैक्षणिक वर्षात केवळ काही दिवसच शाळा भरविण्यात आल्या. आता 23 ऑगस्टपासून वर्ग भरविण्याचे ठरविण्यात आले आहे. शिक्षकांनी मास्कचा वापर करणे सक्तीचे करण्यात आले आहे. 50 वर्षांवरील शिक्षकांनी केवळ मास्कच नव्हे तर फेसशिल्डही घालण्याची सूचना करण्यात आली आहे. जर शिक्षकांना कोरोनाची लक्षणे आढळली तर वरि÷ अधिकाऱयांच्या निदर्शनास आणून त्यांनी रजा घ्यायची आहे. पुन्हा सेवेत हजर होण्यापूर्वी आरटीपीसीआर तपासणी करून घ्यायची आहे. आता शिक्षणाबरोबरच प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी योग, प्राणायाम, व्यायामही करून घेण्याची सूचना शिक्षकांना करण्यात आली आहे. कर्नाटकात ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये तिसरी लाट येण्याची शक्मयता आहे. ही लाट थोपविण्यासाठी प्रत्येक जिल्हय़ात तांत्रिक सल्ला समिती स्थापन करण्यासंबंधी आरोग्य खात्याने आदेश बजावला आहे. शिक्षकांना शाळा सुरू होण्याआधी लस दिली जाणार आहे. खरेतर कर्नाटकात मोठय़ा प्रमाणात लसींचा तुटवडा आहे. सरकारी इस्पितळांसमोर ‘नो स्टॉक’चे फलक झळकत आहेत.
18 वर्षांवरील विद्यार्थ्यांना लस देऊन कॉलेज सुरू करण्याचे ठरविण्यात आले होते. नववी व दहावीत शिकणाऱया विद्यार्थ्यांसाठी तर अद्याप लस आलेली नाही. त्या मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहिला आहे. एकीकडे तिसऱया लाटेत लहान मुले, विद्यार्थ्यांना फटका बसणार, असे तज्ञ डॉक्टर सांगत असतानाच कर्नाटकात शाळा-कॉलेज सुरू करण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. मुलांच्या भविष्याचा विचार करून पालक शाळा सुरू करण्यासाठी दबाव आणत असले तरी तिसऱया लाटेच्या सावटाखाली असताना शाळा सुरू करण्याची घाई नको, असा सल्ला खासगी इस्पितळ व नर्सिंग होम संघटना ‘फना’ने राज्य सरकारला दिला आहे. जर शाळा सुरू करायची असेल तर आठवीच्या खालील मुलांसाठी नको, नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक खबरदारी घेऊन सुरू करावी लागणार आहे. ऑनलाईन व ऑफलाईन हे दोन्ही पर्याय उपलब्ध असावेत. सध्या लहान मुलांमध्ये कोरोनाची बाधा अधिक प्रमाणात दिसून येत आहे. मुलांना कोरोनाची लागण झाली तर तो बरा होऊ शकतो. कोरोना बरा झाल्यानंतर ज्या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात, त्याला सामोरे जाणे कठीण जाणार आहे. त्यामुळेच शाळा सुरू करण्याची घाई नको, असा सल्ला ‘फना’ने दिला आहे.
बेळगावसह आठ जिल्हय़ात विकेंड कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. शाळा-कॉलेज बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दहावीच्या निकालात हे ठळकपणे दिसून आले आहे. ऑफलाईन क्लास सुरू करण्याची गरज असली तरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी घेऊनच सुरू करावे लागणार आहेत. केवळ शिक्षक, शिक्षण संस्था यांनाच नव्हे तर पालकांनासुद्धा हे एक आव्हानच ठरणार आहे. कारण मास्क, सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतर पाळूनच वर्ग भरवावे लागणार आहेत. शिक्षण संस्था बंदचा फटका केवळ विद्यार्थ्यांना नाही तर कंत्राटी शिक्षक, वाहनचालक, स्टेशनरी व्यावसायिक आदींसह अनेक घटकांना बसला आहे. सततच्या ऑनलाईन क्लासमुळे मुलांचे डोळय़ांचे विकार बळावले आहेत. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरही त्याचे परिणाम होत आहेत. एका सर्वेक्षणानुसार विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा वाढतो आहे. विद्यार्थ्यांमध्ये तर एकप्रकारची असमानता निर्माण झाली आहे. काही मुलांमध्ये ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्टफोन आहेत तर काही मुलांकडे स्मार्टफोन नाहीत. या असमानतेच्या फेऱयात अडकलेली चामराजनगर जिल्हय़ातील अनेक मुले मलैमहादेश्वर डोंगरावर भिक्षाटनाला लागली आहेत. समाजातील गरीबांचे हे प्रातिनिधिक स्वरुपाचे विदारक चित्र आहे. सरकारी शाळेत शिकणारी मुलेही ऑनलाईन शिक्षणापासून खूप दूर आहेत.
शाळा बंदमुळे बालकामगारांची समस्या फोफावली आहे. शाळेला जात नाहीस तर निदान कुठेतरी कामाला जा, असे सांगत मुलांना कामाला जुंपण्यात येत आहे. गॅरेज, हॉटेल, दुकानात कामाला पाठविण्यात येत आहे. त्यामुळे ही मोठी समस्या सरकारसमोर उभी ठाकली आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात कोरोनामुळे शाळा बंद आहेत म्हणून मुलांना मजुरी करावी लागत आहे. निश्चितच त्याचा मानसिक परिणाम मुलांवर जाणवत आहेत. ऑनलाईन क्लासबरोबरच मोबाईलवर गेम खेळण्याची सवय वाढली आहे. मुले संपूर्णपणे मोबाईलच्या आहारी गेलेली दिसताहेत. पूर्वी चुकून लहान मुलांनी मोबाईल हातात घेतला की पालक त्यांना दरडावयाचे. मोबाईलबरोबर खेळू नका, अभ्यासाला लागा, असे म्हणायचे. आता अभ्यासाचे साधनच मोबाईल बनले आहे. त्यामुळे दिवसभर मोबाईल हातात असला तरी पालकही काही बोलण्याच्या स्थितीत नाहीत, अशी विचित्र परिस्थिती कोरोनामुळे निर्माण झाली आहे.
ऑफलाईन क्लासमध्ये शिकण्याची जी मजा असते, ती ऑनलाईनमध्ये नाही, हे एक-दीड वर्षाच्या अनुभवावरून स्पष्ट झाले असले तरी ऑनलाईन शिक्षणाशिवाय पर्याय नाही, अशी परिस्थितीच निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात शाळा-कॉलेजचे वातावरण पोषक ठरते. कोरोना, लॉकडाऊन, सीलडाऊन आदींमुळे शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. आता शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सरकार वेगवेगळे प्रयोग राबवत आहे. शाळा बंद असल्या तरी संपूर्ण फी भरण्यासाठी शिक्षण संस्थांचा तगादा सुरू आहे. हा विषय न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. सरकारला ‘फी’च्या मुद्दय़ात हस्तक्षेप करण्याचा अधिकारच नाही, अशी भूमिका खासगी शिक्षण संस्थांनी न्यायालयात मांडली आहे. जर नियमितपणे शाळा सुरू झाल्या तर या सर्व समस्या आपोआप मार्गी लागणार आहेत.








