अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्याने हजारो लोक देश सोडून पलायनाच्या तयारीत आहेत. पण शेजारी देश उज्बेकिस्तान अफगाण शरणार्थींच्या मोठय़ा संख्येवरून चिंतेत पडला आहे. मध्य आशियाई देशाने कोरोना महामारीचे निमित्त पुढे करत अफगाण नागरिकांना व्हिसा देण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे.
उज्बेकिस्तानचे अधिकारी अफगाणिस्तानला लागून असलेल्या सीमेवर तीव्र सुरक्षा बाळगत असून त्यांना धार्मिक कट्टरतावादी देशात शिरण्याची भीती सतावत आहे. उज्बेकिस्तानने अस्थिर शेजारी देशामधील केवळ काही जणांनाच आश्रय दिला आहे. तालिबानच्या उदयानंतर उज्बेकिस्तान आणि ताजिकिस्तानने सीमेवरील सुरक्षा वाढविली आहे. अफगाणिस्तानची सीमा इराण, पाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उज्बेकिस्तान, ताजिकिस्तान आणि चीनच्या शिनजियांग प्रांताला लागून आहे.
1990 मध्ये अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यावर उज्बेकिस्तान सरकारने शरणार्थी करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता. या करारांतर्गत उज्बेकिस्तानला छळाच्या भीतीने पळालेल्या लोकांना आश्रय द्यावा लागला असता. फारशी भाषिक शहर तिरमिज हे उज्बेकिस्तानात जाऊ पाहणाऱया अनेक अफगाणी लोकांच्या पसंतीचे शहर राहिले आहे.









