प्रतिनिधी / आटपाडी
आमदार गोपीचंद पडळकर यांनी बंदी असलेली बैलगाडी शर्यत आयोजित केली असुन सदरची बौलगाडी-छकडा शर्यत होणार नाही, यासाठी शर्यतस्थळी नाकाबंदी करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे शुक्रवारी होणारी बैलगाडी शर्यतीने बादंगाचे रूप घेतले आहे. दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर यांनी नाकाबंदी आदेशावरून राष्ट्रवादीवर टिकास्त्र सोडले.
भाजप प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवारी झरे येथे पारेकरवाडी रस्त्यालगत बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे. शर्यतीला बंदी असुन ही बंदी उठविण्याची मागणी करत अनोख्या पध्दतीने आंदोलन छेडले आहे. त्यांनी बैलगाडी शर्यतीला राज्यातील बैलगाडी मालकांना पाचारण केले असुन त्याची जय्यत तयारीही केली आहे. या शर्यतीच्या निमित्ताने जिल्हा पोलीस अधिक्षकांनी कारवाईचे आदेश विटा उपविभागीय पोलीस अधिकारी व आटपाडी पोलीस निरीक्षकांना दिले आहेत.
शर्यतस्थळी नाकाबंदीचे हे आदेश म्हणजे शर्यत उधळुन लावण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेला प्रयत्न असल्याचा आरोप आमदार पडळकरांनी केला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांसह बैठक घेवुन शर्यतींना विरोध नसल्याचे भासबिले आहे. गृहखात्यामार्फत बळाचा वापर करून शर्यतीच्या ठिकाणी नाकाबंदीचे आदेश दिले आहेत. शर्यतीला अफगाणिस्तानातुन तालीबानी नव्हे तर शेतकरी येणार आहेत. बैलगाडी शर्यती राजकारणाचा विषय नाही. तुम्हाला कळवळा असेलतर तुम्ही सर्वजण मदत करा, असे आवाहन राष्ट्रवादीच्या नेत्यांना केले. बैल, गोवंश वाचविण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी ताकदीने शर्यतीत सहभागी व्हावे, असे आवाहनही आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.