नोंदणीचे अर्ज घेण्यासाठी अधिकारी नसल्याने गैरसोय
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ झाला असून मतदारयादी घेण्यासाठी मनपा कार्यालयात गर्दी होऊ लागली आहे. मात्र मतदारयादी उपलब्ध होण्यास विलंब होत असून मतदारयादीतील नावे आणि परिसराचा थांगपत्ता नसल्याची बाब चव्हाटय़ावर आली आहे. तसेच मतदारयादीत नाव दाखल करण्याचे अर्ज घेण्यासाठी अधिकारी नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
कोरोनाचा प्रसार सुरू झाला असतानाच मनपा वॉर्डनिहाय मतदारयादी तयार करण्याचे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले होते. पण कोरोनाच्या प्रसारामुळे मतदारयादी तयार करण्याचे काम रखडले होते. तसेच महापालिकेचे कर्मचारी देखील कोरोनाबाधित झाल्याने वॉर्डनिहाय मतदारयादी तयार करण्यासाठी मनपा प्रशासनाने मुदत मागितली होती. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने महापालिका निवडणुकीकरिता वॉर्डनिहाय मतदारयादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. पण कोरोनामुळे घरोघरी जावून मतदारयादी तयार करण्यात आली नाही. तसेच कोरोनाकाळातच मतदारयादी प्रसिद्ध करून आक्षेप नोंदवून घेण्यात आले होते.
त्यामुळे मतदारयादीमधील असंख्य मतदारांची नावे गहाळ झाल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच काही मतदारांची नावे चुकीची असल्याचे आढळून आले आहे. मतदारयादीत नावे दाखल करण्यासाठी गणाचारी गल्लीतील मनपाच्या निवडणूक विभागाच्या कार्यालयात धाव घेतली असता याठिकाणी अर्ज घेण्यासाठी कोणीच अधिकारी नाहीत. त्यामुळे नागरिक महापालिकेच्या मुख्य कार्यालयात जावून अर्ज करण्याबाबत विचारणा करीत आहेत. पण याठिकाणी देखील कोणीच अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले नसल्याने मतदारयादीतील नावनोंदणीसाठी कुणाकडे अर्ज करायचे, असा मुद्दा उपस्थित झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. अचानक निवडणुकीची घोषणा झाल्याने मनपा अधिकाऱयांचा गोंधळ उडाला आहे. त्यामुळे मतदारयादीतील नावे दाखल करून घेण्यासाठी अधिकारी नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नावनोंदणी करून घेण्यासाठी अधिकाऱयाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.









