अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक
वार्ताहर / कसबे डिग्रज
मिरज तालुक्यातील पश्चिम भागातील कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, दुधगावसह पूरग्रस्त गावांना जलसंपदा मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी भेट दिली.
कृष्णा आणि वारणा नदीला नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरामुळे घरे, व्यवसाय, शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पूर ओसरताच नुकसानीचे पंचनामे चालू असून ते अंतिम टप्प्यात आहेत. याच पार्श्वभूमीवर विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत पूरग्रस्त गावातील पंचनामे आणि लोकांच्या अडीअडचणी यांचा आढावा घेतला.
महापुरात पडझड झालेली घरे, छोटे मोठे व्यवसायांचे नुकसान, शेतीचे पंचनामे, बाधित आणि स्थलांतरीत लोकांना शासकीय मदत, पुरकाळात बाहेर पडण्यासाठीचे मार्ग यांसह अनेक महत्वपूर्ण विषयांवर पालकमंत्र्यांनी लोकांशी संवाद साधला. यावेळी मिरज प्रांताधिकारी समीर शिंगटे, मिरज तहसीलदार डी.एस.कुंभार, सांगली अप्पर तहसीलदार अर्चना पाटील, मिरज गटविकास अधिकारी आप्पासो सरगर, मंडल अधिकारी विजय तोडकर, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, तलाठी यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.








