पोलंडमधील विश्व युवा तिरंदाजी चॅम्पियनशिप
ऱहोक्लॉ-पोलंड / वृत्तसंस्था
येथे सुरु असलेल्या विश्व तिरंदाजी युवा चॅम्पियनशिपमध्ये भारताने कम्पाऊंड कॅडेट मिश्र व पुरुष सांघिक गटात सुवर्णपदकांची कमाई केली. कम्पाऊंड कॅडेट मिश्र गटातील अंतिम लढतीत भारताने अमेरिकेचा पराभव केला. प्रिया गुर्जर व कौशल दलाल यांच्या भारतीय जोडीने अमेरिकन प्रतिस्पर्ध्यांना 155-152 अशा निसटत्या फरकाने मात दिली.
नंतर, प्रिया दलालने महिला कॅडेट वैयक्तिक गटात रौप्य जिंकले. तिला अंतिम लढतीत मेक्सिकन प्रतिस्पर्धीविरुद्ध 136-139 अशा निसटत्या फरकाने पराभव पत्करावा लागला. परणीत कौरने महिलांच्या कम्पाऊंड कॅडेट इव्हेंटमध्ये कांस्य पदकाच्या प्ले-ऑफ लढतीत बाजी मारली. तिने आपल्या ब्रिटीश प्रतिस्पर्धीला 140-135 अशा फरकाने मात दिली.
कम्पाऊंड पुरुष सांघिक गटात भारताने अमेरिकेचा फायनलमध्ये पराभव केला. साहिल चौधरी, मिहिर नितीन अपर, कुशल दलाल यांनी अमेरिकन संघाचा 233-231 असा पराभव केला. तत्पूर्वी, दिवसाच्या प्रारंभी भारताने कम्पाऊंड कॅडेट महिला सांघिक गटात सुवर्ण जिंकले. या संघाने तुर्की संघाला 228-216 अशा फरकाने मात दिली. परणीत कौर, प्रिया गुर्जर, रिधी वर्षिनी यांनी उत्तम सांघिक खेळ साकारत विजय खेचून आणला.









