वार्ताहर / राशिवडे
राशिवडे येथील नागेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी वरुन आलेल्या दोघांनी वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचा सर हिसकावून चोरट्यानी पलायन केले. ही घटना आज दुपारी अडीच वाजता घडली. शेताकडून घरी येत असलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
लक्ष्मीबाई रामचंद्र पोवार (वय ७२) ही महिला शेताकडून घरी येत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने या महिलेला थांबवले. आजूबाजूला कोणी नाही हे पाहून महिलेच्या गळ्यातील सोन्याचा सुमारे एक तोळ्या पेक्षा अधिकचा सर हिसकावून पलायन केले.
या झटापटीत वृद्ध महिला खाली पडल्याने किरकोळ जखमी झाली. चोरटे चांदे (ता. राधानगरी) च्या दिशेने गेले असल्याची माहिती मिळाली. शोधाशोध केली मात्र कोणीही मिळाले नाही. अशा प्रकारची घटना राशिवडे परिसरामध्ये पहिल्यांदाच घडल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी राधानगरीगरीचे. पोलिस निरीक्षक उदय डुबल, उपनिरीक्षक पाटील, पोलीस सुरेश मेटील,कृष्णात खामकर यांनी भेट दिली.