वेळीच गांभीर्य ओळखून निवडणूक पुढे ढकला : सिटीझन कौन्सिलचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनासारख्या महाभयंकर आजाराला जनता तोंड देत असताना अचानक महापालिकेची निवडणूक जाहीर करणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. मागीलवेळी झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. इतर राज्यांमध्येही झालेल्या निवडणुकीमुळेच कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचे स्पष्ट झाले होते. असे असताना महानगरपालिकेची निवडणूक जाहीर करणे योग्य नाही. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत किमान सहा महिने ही निवडणूक पुढे ढकलावी, अशा मागणीचे निवेदन सिटीझन कौन्सिल आणि बांधकाम कामगार संघटनेतर्फे राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नावे जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले.
कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले. आता विकेंड कर्फ्यूही जाहीर करण्यात आला आहे. असे असताना महापालिकेची निवडणूक जाहीर करून साऱयांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. तिसरी लाट येणार असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी सांगितले आहे. या लाटेमध्ये मुलांनाच अधिक धोका आहे. तेव्हा निवडणुकीबाबत गांभीर्याने निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. लॉकडाऊन आदेशाचे पालन जनतेने काटेकोरपणे केले आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय, शाळा, उद्योग सर्व बंद होते. आता कोरोना कमी झाल्यानंतर काही प्रमाणात व्यवसाय आणि उद्योगांना चालना मिळाली आहे. अजूनही शाळा सुरू नाहीत, अशा समस्या आहेत. असे असताना ही निवडणूक जाहीर करणे म्हणजे कोरोनाला आमंत्रण देण्याचाच प्रकार असल्याचे म्हटले आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सरकार, नागरिक व प्रशासन यांनी एकजुटीने प्रयत्न करणे काळाची गरज आहे. दीर्घकाळचा लॉकडाऊन नागरिकांनी सोसला आहे. आता कोठे जनजीवन पूर्वपदावर येत असताना निवडणुका जाहीर केल्याने कोरोनाचा संभाव्य धोका वाढण्याची शक्मयता आहे. त्यामुळे अशा प्रतिकुल परिस्थितीत निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी करण्यात आली. निवडणुकीमुळे निश्चितच गंभीर समस्या निर्माण होणार आहेत. तेव्हा किमान सहा महिने ही निवडणूक पुढे ढकलावी, त्याचबरोबर त्यावेळची परिस्थिती पाहूनच ही निवडणूक घ्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सिटीझन कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडोलकर, सेवंतीलाल शाह, बांधकाम संघटनेचे अध्यक्ष ऍड. एन. आर. लातूर व पदाधिकारी उपस्थित होते.









