जिल्हा आरोग्य अधिकाऱयांचे आदेश : ‘तरूण भारत’ने उघडकीस आणलेल्या घोटाळय़ांवर शिक्कामोर्तब
प्रतिनिधी /सातारा
अपलोड घोटाळा, मृत्यूच्या नोंदीचा घोटाळा तरूण भारतने उघडकीस आणला होता. हे घोटाळे सुरू होते, यावर जिल्हा आरोग्य अधिकाऱयांच्या 10 ऑगस्टच्या एका पत्राने शिक्कामोर्तब केले आहे. जिह्यातील प्रयोगशाळा, खासगी लॅब, कोरोना केअर सेंटर, शासकीय, खासगी रूग्णालयांना पुन्हा एकदा खडसावले आहे. 10 ऑगस्ट 2021 पासून 24 ऑगस्ट 2021 पर्यंत सर्व प्रलंबित नोंदी तात्काळ ऑनलाईन फॉसिलिटी ऍपमधे भरण्याच्या सूचना या पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. 24 ऑगस्टपासून ऍपमधे बदल होणार असल्याने प्रलंबित नोंदी करता येणार नसल्याने जिह्यातील यंत्रणा खडबडून जागी होत कामाला लागली आहे.
दरम्यान, 15 ऑगस्टपासून राज्यात लॉकडाऊनमधे शिथिलता देण्यात येणार असल्याने रूतलेला आर्थिक गाडा पुन्हा सुरू होण्याचे संकेत आहेत. दुसऱया बाजूला रोजच्या रूग्णसंख्येने गुरूवारी पुन्हा उसळी घेतली. 973 रूग्ण बुधवारी रात्रीच्या अहवालात बाधित आले असून 14 बाधितांचा मृत्यू झाला आहे. 695 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
नोंदी राहून गेल्यास संबंधित अधिकाऱयांची जबाबदारी
जिह्यातील कोरोना केअर सेंटर, खासगी लॅबकडून पॉझिटिव्ह रूग्णांचे अहवाल तसेच रूग्णांच्या मृत्यूच्या नोंदी वेळेत केल्या जात नव्हत्या. ‘तरूण भारत’ने हे घोटाळे जिल्हा आरोग्य विभागाच्या निदर्शनास आणून दिले होते. जिल्हा आरोग्य अधिकाऱयांनी जिह्यातील प्रयोगशाळा, खासगी लॅब, कोरोना केअर सेंटरना पत्राद्वारे आदेश दिले आहेत. आयसीएमआर सचिवांनी दिलेल्या आदेशानुसार मागील सर्व रॅट टेस्टींगच्या शिल्लक नोंदी त्वरित करण्याच्या सूचना आहेत. यापुढे सदर नोंदी ऍपमध्ये वेळेत न भरल्यास ऍपमधील बदलामुळे त्याची नोंद परत करता येणार नाही. त्यामुळे शिल्लक नोंदी त्वरित पूर्ण कराव्यात. जर नोंदी करावयाचे राहून गेले तर यांची सर्वस्व जबाबदारी आपली राहील.
होमआयसोलेशन, मृत्यूंची आकडेवारीही भरावी
होम आयसोलेशनमध्ये व सीसीसी सेंटरमध्ये दाखल होणाऱया कोविड रुग्णांची माहितीही फॉसिलिटी ऍपमध्ये अद्ययावत करणे गरजेचे आहे. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी व संबंधीत सीसीसीचे नोडल अधिकारी यांनी नियमितपणे कार्यवाही करावी. सर्व डिसीएच व डिसीएचसीमध्ये पेंडींग टेस्टिंगच्या व मृत्यूच्या नोंदी संबंधीत पोर्टलवर किंवा ऍपवर त्वरित भरण्यात याव्यात. सर्व खासगी प्रयोग शाळांनी त्यांच्याकडील पेंडींग इंट्री त्वरित पूर्ण करावी. या सर्व नोंदी 24 ऑगस्ट 2021 पूर्वी पूर्ण कराव्यात. या कालावधीनंतर ऍपमधील बदलामुळे सदर नोंदी करणे शक्य होणार नाही. त्यामुळे संबंधीत कर्मचारी व अधिकारी यांनी पेंडींग नोंदी व या पुढील काळातील नोंदी वेळेत अपडेट होतील यांची दक्षता घ्यावी, असे या आदेशान म्हटले आहे.
निर्बंध शिथिलतेने दिलासा
स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर राज्यातील मॉल, हॉटेल, दुकानांना रात्री 10 वाजेपर्यंत व खासगी कार्यालये 24 तास खुली ठेवण्याबाबत राज्य सरकारने आदेश जारी केले आहेत. हे आदेश संपूर्ण राज्यासाठी लागू आहेत. यामुळे अर्थ चक्र गतिमान होण्यास मदत होणार आहे.
जिल्हय़ात पुन्हा मोठी रूग्णवाढ
कालच्या 24 तासात जिह्यात विविध सेंटरमधील एकूण पॉझिटिव्ह 973 आले आहेत. 24 तासात एकूण टेस्ट 13548 एवढय़ा झाल्या असून पॉझिटिव्हीटी रेट 7.18 टक्के नोंदवला गेला आहे. यात फलटण तालुक्यात सर्वाधिक 186 रूग्ण आढळले आहेत.
खटाव तालुक्यात 179 रूग्ण
या अहवालात 179 रूग्ण खटाव तालुक्यात आढळले आहेत. ही सुद्धा मोठी वाढ असून कराड तालुक्याचा आकडा शंभरपेक्षा कमी झाला आहे. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे – जावली 22 (9566), कराड 97 (36425), खंडाळा 36 (13420), खटाव 179 (22713), कोरेगाव 76 (19841), माण 122 (15595), महाबळेश्वर 1 (4543) पाटण 13 (9745), फलटण 186 (32392), सातारा 171 (46908), वाई 56 (14821) व इतर 14 (1732) असे आजअखेर एकूण 227701 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
14 बाधितांचा मृत्यू
जिल्हय़ात गेल्या चोवीस तासात 14 बाधितांचा मृत्यू झाला असून आजअखेर मृत्यू झालेल्यांची संख्या 5518 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
695 जणांना डिस्चार्ज
जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 695 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
गुरूवारी जिल्हय़ात
- एकूण बाधित 973
- एकूण मुक्त 695
- एकूण मृत्यू 14
गुरूवारपर्यंत जिल्हय़ात
- एकूण नमूने 1526454
- एकूण बाधित 228659
- घरी सोडलेले 214987
- मृत्यू – 5518
- उपचारार्थ रुग्ण-10363









