वेंगुर्ले / वार्ताहर:
स्वातंत्र्यदिना निमित्त राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, सन्मान राखला जावा. याबाबत आवश्यक ती खबरदारी घ्यावी. दुकानांवर विक्री होणारे कागदी व प्लास्टिकचे राष्ट्रध्वज तसेच तिरंगाच्या रंगातील मास्क यावर बंदी घालावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आज गुरुवारी वेंगुर्ला तहसिलदार प्रवीण लोकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
हिंदू जनजागृती समितीचे सचिन नाईक, गोपाळ जुवलेकर, प्रविण कांदळकर, महेश जुवलेकर, दाजी नाईक यांनी तहसिलदार यांना हे निवेदन सादर केले. १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनानिमित्त बाजारात विक्रीसाठी ठेवलेले प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वज तसेच तिरंगाच्या रंगातील मास्क विक्रीबाबत लक्ष वेधले आहे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवले जातात. त्यानंतर तेच राष्ट्रध्वज रस्त्यावर गटारात फाटलेल्या अवस्थेत दिसून येतात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान व विटंबना होते. राष्ट्रध्वज ही राष्ट्राची अस्मिता आहे त्याचे पावित्र्य राखले गेले पाहिजे. तसेच तिरंगा मास्क हे देशप्रेम प्रदर्शनाचे माध्यम नाही तर अशोकचक्र असलेला तिरंगी रंगाचा मास्क बनवणे आणि तो वापरणे हा अपराध आहे. याबाबत सर्वसामान्य जनतेला प्रबोधन व्हावे. स्वातंत्र्यदिना निमित्त राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला जावा याबाबत आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी विनंती हिंदू जनजागृती समितीने या निवेदनाद्वारे केली आहे.









