तरुण भारत संवाद प्रतिनिधी / अक्कलकोट
अक्कलकोट शहरातील शिवाजी नगर तांडा येथे अवैध दारू विक्री धंद्यावर छापा टाकुन सचिन चव्हाण यास घेऊन जाताना पोलिसांच्या अंगावर धावून जाऊन शिवीगाळ, दमदाटी करून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. ऋतुराज उर्फ बंटी टोपू राठोड (रा. शिवाजीनगर, तांडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, दिनांक ८ रोजी अक्कलकोट शहरात गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र राठोड, पोलीस शिपाई चिदानंद उपाध्ये, प्रमोद शिंपाळे, कोळी शहरात गस्त घालत मंगळूरे चौकात आल्यावर त्यांना छाया किराणा दुकानाच्या बाजूला अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली. दि. ८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सदर ठिकाणी छापा टाकला असता सचिन सुरेश चव्हाण हा अवैध दारू विक्री करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याला ताब्यात घेऊन जात असताना आरोपी ऋतुराज उर्फ बंटी राठोड याने तुम्ही आमच्या लोकांवर सारखीच कारवाई करता, दुसरे कोण नाही का? तुम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरून तांड्यातील लोकांना त्रास देताय, तुम्ही याला कसे घेऊन जाता ते बघतो, असे म्हणून सचिन चव्हाण याला हाताला धरून तू यांचे सोबत जायचे नाही, तुम्ही हात तरी लावून बघा त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे म्हणून आरोपीने शिवीगाळ, दमदाटी करत पोलिसांच्या अंगावर धावून येऊन सरकारी कामात अडथळा आणल्याचे पोलीस शिपाई गजानन गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मोतीराम मोरे करीत आहेत.