2 वर्षांसाठी घेणार सेवेत -प्रकल्पांतर्गत 16 पदे भरणार
प्रतिनिधी/ रत्नागिरी
राजापूर तालुक्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, एनपीसीआयएल, अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत ज्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत, अशा प्रकल्पग्रस्त कुटुंबातील पात्र सदस्यांना 2 वर्षांसाठी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाअंतर्गत सेवेत घेतले जाणार आहे. या उमेदवारांकडे उपविभागीय अधिकारी, राजापूर सक्षम प्राधिकरणाकडून दिले जाणारे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
प्रकल्पांतर्गत 16 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये 6 लिपिकीय सहाय्यक पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी उमेदवार हा पदवीधर असावा तसेच कॉम्प्युटरचे ज्ञान अवगत असलेला असावा तर 10 कार्यालय सहाय्यक पदे भरण्यात येणार आहेत. कार्यालय सहाय्यक पदासाठीचा उमेदवार 10वी पास असावा, अशी अट घालण्यात आली आहे. या उमेदवारांचे वय 9 ऑगस्ट 2021 तारखेपर्यंत 18 वर्षाखालील नसावे. सर्वसामान्य गटात उमेदवाराच्या वयाची मर्यादा 47 वर्षे आहे. ओबीसी प्रर्वगातील उमेदवारांची वयोमर्यांदा 50 वर्षे तसेच अनुसूचित जाति/ अनुसूचित जमातीतील उमेदवारांचे किमान वय 52 वर्षे असावे. या उमेदवारांना रत्नागिरीतील संपर्क कार्यालय, जैतापुरातील माडबन प्रकल्पातील कार्यालय किंवा अन्य कोणत्याही स्थानी रुजू केले जाऊ शकते.
9 ऑगस्ट 2021 पूर्वी किंवा त्या आधी विनंती केलेल्या दस्तऐवजांसह निवेदनातून प्राप्त झालेले अर्ज तपासले जातील. उमदेवाराने केलेल्या अर्जावर पासपोर्ट साईज फोटो, सही व अर्ज परिपूर्ण असावा. मुलाखतीची तारीख, वेळ, पत्राद्वारे किंवा इमेलद्वारे कळवली जाईल. हे पत्र उमेदवाराने मुलाखतीवेळी सोबत घेऊन यावयाचे आहे. मुलाखतीसाठी उमेदवाराने मूळ कागदपत्र सोबत घेऊन यायचे आहे. उमेदवारांची कॉम्प्युटर टायपिंगची परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा पास झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. कार्यालय सहाय्यक पदासाठी कॉम्प्युटर टायपिंगची परीक्षा आवश्यक नाही. उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जात वरील डाव्या बाजूला पासपोर्ट साईज रंगीत फोटो, जाहिरात क्रमांक, अर्जदाराचे पूर्ण नाव, आई व वडिलांचे पूर्ण नाव तसेच जन्मतारखेची नोंद करणे बंधनकारक आहे, असे कळवण्यात आले आहे.









