सातारा / प्रतिनिधी :
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सुचनेनुसार सातारा जिल्ह्यात जुगार व दारू अड्डयांवर छापे टाकून कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटण शहर पोलिसांनी शंकर मार्केटमध्ये जुगार चालवणाऱ्या सुनील सुभाष कदम (वय 48, रा. बुधवार पेठ फलटण) याच्यावर कारवाई करुन 1250 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. शाहुपूरी पोलिसांनी सम्राट वडापावच्या आडोशाला चालणाऱ्या जुगार अड्डयावर छापा टाकून विश्वास लक्ष्मण पवार (वय 42, रा. कामठी) याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याच्याकडून 545 रुपयांची रोखड व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
तसेच जुना मोटारस्टॅण्ड येथे राजेभोसले संकुलाच्या पार्किंगमध्ये चालणाऱ्या जुगार अड्डयावर छापा टाकून जाफर शहाबुद्दीन सय्यद(वय 50, रा. मल्हारपेठ सातारा), चंद्रमणी धनंजय आगाने (रा. घोरपडे कॉलनी, सातारा) यांच्यावर कारवाई करुन त्यांच्याकडून 745 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले.
दहिवडी पोलिसांनी गोंदवले बुद्रुक येथे कारवाई करुन गणेश दाजी शिरतोडे (वय 26, रा. गोंदवले बुद्रुक), सुहास नारायण रणपिसे(रा. दहिवडी, ता. माण) याच्यावर कारवाई करुन त्याच्याकडून 720 रुपये रोख व जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले. पाटण पोलिसांनी मल्हारपेठ येथे बबन शंकर पाटील याच्यावर कारवाई करुन 1240 रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले.
दारु विक्रीच्या कारवाई
सातारा तालुका पोलिसांनी तासगाव येथे मुळीकवाडी फाट्यावर बेकायदेशीर दारु विक्री करणारा धमेंद्र पिराजी कांबळे (वय 52, रा. मुळीकवाडी) याच्यावर कारवाई केली. त्याच्याकडून 720 रुपयांच्या 12 बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. वडूज पोलिसांनी वडूज येथे दारु विक्री करणाऱ्या संतोष रामराव फडतरे (वय 35, रा. वाकेश्वर) याच्यावर कारवाई करुन 2250 रुपयांच्या 50 बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. खंडाळा पोलिसांनी बावडा येथे दारु विक्री करणाऱ्या विनोद बाळू गायकवाड (वय 42, रा. खंडाळा) याच्यावर कारवाई करुन त्याच्याकडून 900 रुपयांच्या दारुच्या 15 बाटल्या हस्तगत केल्या. पुसेगाव पोलिसांनी विसापुर येथील स्मशानभूमीजवळ करंजाच्या झाडाखाली गणेश नारायण जाधव (वय 36, रा. गाववाडी) याच्यावर कारवाई करुन 840 रुपयांच्या दारुच्या 14 बाटल्या हस्तगत करण्यात आल्या.