प्रतिनिधी / सातारा :
कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी शहरातील बाजारपेठेत तसेच मुख्य ठिकाणी विक्रेते, नागरिकांची जागेवरच फिरत्या पथकाद्वारे कोरोना चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीदरम्यान, पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांची विलगीकरण कक्षात रवानगी केली जात असल्याची माहिती सातारा नगर पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या निर्देशांनुसार शहरातील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथील करण्यात येत आहेत. यामध्ये अत्यावश्यक बाबींची तसेच इतरही दुकाने सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत चालु ठेवण्यास परवानगी आहे. यामुळे शहरात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. सर्वच नागरिकांनी कोरोना चाचणी केलेली नाही. यामुळे शहरात फिरत्या पथकाद्वारे यांची रॅट आणि आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. चालु महिन्याच्या दि. 6 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र गोडोली, कस्तुबा रूग्णालय व फिरते पथक यांनी एकूण 360 जणांची रॅट चाचणी केली. यामध्ये एकही नागरिक पॉझिटिव्ह आला नाही. तर दि. 7 रोजी रॅट च्या 310 टेस्ट झाल्या. 2 जण पॉझिटिव्ह आढळले. त्यांना उपचारासाठी जिल्हा कोविड सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे. दिवसभरात शहरात 300 रॅट चाचणी व 200-250 आरटीपीसीआर करण्यात येतात. एकून दिवसाला 500 ते 550 टेस्ट करण्यात येतात. गेल्या महिन्याभरात केलेल्या चाचणीनुसार 1 टक्क्यापेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट नसल्याचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सांगितले.