बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी मंत्र्यांना शनिवारी खात्यांचे वाटप केल्याच्या काही तासांनंतर, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आनंद सिंह यांनी शनिवारी त्यांना दिलेल्या खात्याबद्दल नाराजी व्यक्त केली. विजयनगरचे आमदार असलेले आनंद सिंह यांनी अप्रत्यक्षपणे धमकी दिली आहे. जर त्यांना खाते बदलून दिले नाही तर ते मंत्रिपदाचा राजीनामा देतील.
“मी सीएम बोम्माई आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना मला हव्या असलेल्या मंत्रिपदासाठी विनंती केली होती. त्यांनी मला माझ्या विनंतीवर विचार करण्याचे आश्वासन दिले होते. पण मला पर्यटन आणि पर्यावरणशास्त्र विभाग देण्यात आले हे. ते मी मागितले नव्हते. मी निराश आहे …” असे आनंद सिंह यांनी पत्रकारांना सांगितले.
“मी पुन्हा मुख्यमंत्री आणि येडियुरप्पा यांची भेट घेईन आणि त्यांना माझ्या विनंतीचा पुनर्विचार करायला सांगेन. जर त्यांनी माझे खाते बदलले नाहीत तर मी आमदार म्हणून राहू शकतो,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे बोम्माई यांना मंत्रिमंडळ सोडण्याची धमकी दिली.
“भाजपला सत्तेवर आणण्यासाठी मी केलेल्या त्यागाचा विचार करून त्यांनी (पक्ष नेतृत्वाने) मला माझ्या आवडीचे खाते दिले पाहिजे.
किमान त्यांनी मला मागितलेले खाते न देण्याचे कारण स्पष्ट केले पाहिजे, असे ते म्हणाले. मंत्री आनंद सिंह यांनी आपल्या निकटवर्तीयांना विश्वास दिला होता की त्यांना ऊर्जा किंवा पीडब्ल्यूडी खाते मिळेल. पण मंत्री आनंद सिंह यांना पर्यटन आणि पर्यावरण खाते दिल्याने ते नाराज असून त्यांनी मंत्रिमंडळ सोडण्याची धमकी मुख्यमंत्र्यांना दिली आहे.