भटकळमध्ये एनआयएचा छापा : दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरून कारवाई
प्रतिनिधी /बेंगळूर
सिरियातील दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या आरोपावरून कारवार जिल्हय़ाच्या भटकळ येथील एका युवकाला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱयांनी शुक्रवारी सायंकाळी अटक केली आहे. जुफ्री जवाहर दामुदी (वय 30, रा. जालीया उमर स्ट्रीट, भटकळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
जुफ्री हा दहशतवादी संघटनेशी संबंधित नियतकालिक ‘व्हॉईस ऑफ हिन्द’ चे दक्षिण भारतातील भाषांमध्ये भाषांतर करत होता. त्याच्या आणि भटकळमधील एका निवासस्थानावर एनआयएच्या पथकाने छापे टाकले. या कारवाईत मोबाईल, सीमाकार्डे, मेमरी कार्ड, कॉम्प्युटरचे हार्डडिस्क व इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
भारतातील शांततेला धक्का पोहोचविण्यासाठी आयएस या दहशतवादी संघटनेसाठी युवकांची नेमणूक करीत असल्याच्या आरोपावरून ‘व्हॉईस ऑफ हिंद’ या संस्थेविरुद्ध दिल्लीत 29 जून 2021 रोजी गुन्हा दाखल झाला होता. या नियतकालिकेतील लेख ‘अबु हाजीर अल बद्री’ या आयडीद्वारे भाषांतर करण्यात येत होते. यामागे जुफ्रीचा हात असल्याचा संशय एनआयएला होता. त्यामुळे छापा टाकून त्याला अटक करण्यात आली आहे.
आयएस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरून 2016 अटक झालेल्या अदनान हसन दामुदी याचा तो लहान भाऊ असल्याचे एनआयएने पत्रकाद्वारे सांगितले आहे. या प्रकरणासंबंधी 11 जुलै रोजी एनआयएच्या पथकाने जम्मू आणि काश्मीरमधील विविध ठिकाणी छापे टाकले होते. अनंतनाग जिल्हय़ातील अचबल येथे उमर निसार, तन्वीर अहमद भट आणि रमीज अहमद यांना अटक करण्यात आली होती.
बुधवारी चौघांना केली होती अटक
एनआयएने बुधवारी मंगळूरसह विविध ठिकाणी छापे टाकून सीमकार्डे, आक्षेपार्ह कागदपत्रे व इतर साहित्य ताब्यात घेतले होते. सखोल चौकशीनंतर चौघांना अटक करण्यात आली. श्रीनगरमधून ओबैद हमीद, बंदीपोरा येथून मुजम्मिल हसन बट्ट, मंगळूरच्या उळ्ळाल येथून अम्मर अब्दुल रेहमान आणि बेंगळूरमधील शंकर पेरुमाळ अका मुवाविया यांना अटक करण्यात आली होती. ते दहशतवादी संघटनेसाठी पैसे जमा करणे आणि युवकांना आयएस संघटनेत सहभागी होण्यासाठी प्रेरित करत होते, अशी माहिती एनआयएच्या अधिकाऱयांनी दिली आहे.









