आपत्कालीन सेवेसाठी 400 स्वयंसेवक नेमणार : फोंडा स्टेशनसाठीच्या नवीन वाहन कार्यरत
प्रतिनिधी /पणजी
सांतइनेज – पणजी येथील अग्निशामक दलाच्या मुख्य कार्यालयात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवीन वाहनास बावटा दाखवून ते फोंडा अग्निशामक स्टेशनसाठी कार्यरत केले तसेच राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाशी समन्वय करार केल्याची माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, या करारानुसार गोव्यात आपत्कालीन सेवेसाठी 400 स्वयंसेवक नेमण्यात येणार असून त्यातील 200 उत्तर गोवा आणि 200 दक्षिण गोवा जिह्यासाठी घेतले जाणार आहेत. होमगार्डसारखी ती सेवा असून त्यांना मासिक तत्वावर मानधन देण्यात येणार आहे. अग्निशामक दलाच्या विविध सेवांसाठी ती एwच्छिक सेवा असून त्यात तरुण – तरुणींना संधी देण्यात येणार आहे. 12 तालुक्यात विविध ठिकाणी असलेल्या अग्निशामक दलाच्या स्टेशनात त्यांची नेमणूक केली जाणार आहे. महिलांना आपदा सखी, पुरुषांना आपदा मित्र संबोधण्यात येणार असून निवड झालेल्या 400 जणांना 15 दिवसांचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. विविध सेवांसाठी जेव्हा, ज्या ठिकाणी गरज भासेल तेव्हा त्यांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली. अग्निशामक दलाचे संचालक अशोक मेनन व इतर अधिकारी त्यावेळी उपस्थित होते. डॉ. सावंत यांनी नारळ वाढवून नवीन वाहनाचा शुभारंभ केला.









