बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यातील खासगी शाळा चालक लवकरात लवकर शाळा सुरु करण्याची मागणी सरकारकडे करत आहेत. राज्यात शाळा सुरु करायच्या झाल्यास सरकारला योग्य ती खबरदारी घ्यावी लागणार आहे. सरकारही खबरदारी घेऊन शाळा सुरु करण्याचा विचार करत आहे. पण सरकारच्या काही अटी आहेत. शाळा सुरु करायच्या झाल्यास शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालकांचे लसीकरण होणे अनिवार्य आहे. दरम्यान शिक्षकांचे आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरु असून पालकांचेही लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी शाळ अभिनव उपक्रम राबवत आहेत. कर्नाटकातील खाजगी शाळा त्यांच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे लसीकरण झाले असल्यास ग्रेस गुण देणार आहेत. दरम्यान, शाळा लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवत आहे.
कर्नाटकातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या असोसिएटेड मॅनेजमेंट्स (केएएमएस) चे सरचिटणीस डी. शशिकुमार यांच्या मते, प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यासक्रमानुसार विविध सामाजिक प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त उपक्रमांचा भाग म्हणून हे गुण दिले जातील.
“प्रत्येक पालकाचे लस प्रमाणपत्र सादर केल्यावर, विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गुण दिले जातील, जे एकूण चार पर्यंत असू शकतात. दरम्यान, राज्यातील सर्व ४ हजार सदस्य शाळांना हा उपक्रम हाती घेण्यास सांगण्यात येणार आहे.लवकरच आदेश जारी केला जाईल,” असे शशिकुमार म्हणाले .