गोपनियतेची शपथ न घेतल्याने पुन्हा शपथविधी
प्रतिनिधी /बेंगळूर
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी झाला. 29 नूतन मंत्री राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या उपस्थितीत शपथबद्ध झाले. प्रथमच मंत्रिपदाची संधी मिळालेले नवलगुंदचे आमदार शंकर पाटील मुनेनकोप्प यांना मात्र, दोन वेळा शपथ घ्यावी लागली. कारण राजभवनमधील शपथविधी कार्यक्रमात मुनेनकोप्प यांनी केवळ अधिकारपदाची शपथ घेतली. त्यामुळे त्यांना सायंकाळी राजभवनमध्ये पद आणि गोपनियतेची शपथ घ्यावी लागली.
राज्यपालांच्या विशेष सचिवांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. शंकर पाटील मुनेनकोप्प हे बुधवारी दुपारी राजभवनमध्ये केवळ अधिकारपदाचीच दोन वेळा शपथ घेतली. मात्र, त्यांनी गोपनियतेची शपथ घेतली नसल्याचे राज्यपालांच्या निदर्शनास आले. त्यामुळे मुनेनकोप्प यांना सायंकाळी राजभवनमध्ये बोलावून घेण्यात आले. नंतर त्यांनी राज्य सरकारचे मुख्य सचिव पी. रवीकुमार यांच्या उपस्थितीत पद आणि गोपनियतेची शपथ घेतली, अशी माहिती राज्यपालांचे विशेष सचिव आर. प्रभूशंकर यांनी दिली आहे.
प्रभू चौहान यांनी घेतली गोमातेच्या नावे शपथ
नूतन मंत्र्यांपैकी अनेक जणांनी परमेश्वराच्या नावे शपथ घेतली. तर बंजारा समुदायाचे नेते प्रभू चौहान यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. त्यांनी गोमाता आणि संत सेवालाल यांच्या नावे मंत्रिपदाची शपथ घेतली. शिवराम हेब्बार आणि शशिकला जोल्ले यांनी परमेश्वर आणि मतदारसंघातील जनतेच्या नावे मंत्रिपदाची शपथ घेतली. तर मुरुगेश निराणी आणि शंकर पाटील मुनेनकोप्प यीं परमेश्वर आणि शेतकऱयांच्या नावे आणि बी. सी. पाटील यांनी बसवेश्वरांच्या नावे शपथ घेतली.









