वृत्तसंस्था/ गयाना
पाक क्रिकेट संघाने चार सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान विंडीजचा 1-0 असा पराभव केला. या मालिकेतील चौथ्या आणि शेवटचा सामना मंगळवारी पावसामुळे पूर्ण वाया गेला.
या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर गेल्या शनिवारी येथे झालेल्या दुसऱया सामन्यात पाकने विंडीजचा 7 धावांनी पराभव करून मालिकेत आघाडी घेतली. त्यानंतर या मालिकेतील तिसरा आणि चौथा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. मंगळवारी झालेल्या चौथ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विंडीजने 3 षटकांत बिनबाद 30 धावा जमविल्या होत्या. फ्लेचर आणि गेल या जोडीने आक्रमक फटके मारून विंडीजच्या डावाला दणकेबाज सुरूवात करून दिली होती पण पुन्हा पावसाचा अडथळा आल्याने हा सामना पंचांनी रद्द केला. आता उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 12 ऑगस्टपासून जमैका येथे सुरू होईल.









